Tuesday, July 28, 2026
Homeशहरमुंबईकरांच्या जीवाची काळजी असेल तर सर्व 'मॅनहोल्स'वर तात्काळ जाळ्या बसवा - अंकित...

मुंबईकरांच्या जीवाची काळजी असेल तर सर्व ‘मॅनहोल्स’वर तात्काळ जाळ्या बसवा – अंकित प्रभू

मुंबई, दि. ०४ (प्रतिनिधी ) :- मुंबईकरांच्या जीवाची काळजी असेल तर सर्व ‘मॅनहोल्स’वर तात्काळ जाळ्या बसवा, सर्व ‘मॅनहोल्स’चे आरेखन करा, अशा सूचना करणारे पत्र ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना आज दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘मॅनहोल्स’ मध्ये पडून मुंबईकरांचे जीव जाण्याचे धक्कादायक प्रकार मुंबई मध्ये घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवक अंकित प्रभू यांनी हे पत्र आयुक्तांना दिले आहे. मुंबईतील सिमेंट काँक्रीट टप्पा १ व २ प्रमाणे तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांवरील ‘मॅनहोल्स’वर आरेखन करून जाळ्या बसवाव्यात त्याचप्रमाणे नविन तंत्रज्ञान वापरुन ‘मॅनहोल्स’चा माहिती संच उपलब्ध होईल अशी सुविधा करावी, अशा सूचना प्रभाग क्रमांक ५४ ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना या पत्राद्वारे केल्या आहेत.

नगरसेवक अंकित प्रभू यांनी उल्लेखल्या प्रमाणे मुंबईत शहर व उपनगरांत मिळून जवळपास ०१ लाख ०३ हजार ९२६ ‘मॅनहोल्स’ आहेत. यापैकी हजारो ‘मॅनहोल्स’ वर सरंक्षक जाळ्या बसवल्या गेल्या नाहीत. अश्या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दोन जुलै रोजी दुर्दैवी घटनेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत आता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत केतन सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात मांडले आहे.

मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटी रस्ते बनवले जात आहेत. मात्र, या रस्त्यांवर असणा-या ‘मॅनहोल्सवर’ सरंक्षक जाळ्या बसविल्या गेल्या नाहीत. त्याचबरोबर सदर ‘मॅनहोल्स’ चे आरेखन किंवा माहिती संच तेथील संबंधित अधिका-यांना उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे ‘मॅनहोल्स’ मध्ये पडून मुंबईकरांचे नाहक बळी जात आहेत, आपण या सुधारणा केल्यास मुंबईकरांचे प्राण वाचतील, असे अंकित सुनील प्रभू यांनी या पत्रात निक्षून सांगितले आहे.

हेही वाचा

लक्षवेधी