Friday, September 11, 2026
Homeशहरदेवळेचा बळी देवून सुभाष जोशी, डॉ. अरुण निरंतर मोकाट

देवळेचा बळी देवून सुभाष जोशी, डॉ. अरुण निरंतर मोकाट

पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी

बीड, दि. ०७ [प्रतिनिधी] :- खातेदारांच्या ठेवींची अफरातफर करणे, बेकायदा कर्ज वाटप करणे, बेकायदा कर्ज माफी करणे अशा प्रकरणांमुळे आधीच ‘पूर्ण वादी’ ठरलेल्या पूर्णवादी नागरिक सहकारी बँक म. बीड च्या जालना येथील शाखेत घडलेल्या ‘वेअर हाऊस’ तारण घोटाळा प्रकरणाने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. असे असले तरी भ्रष्टाचाराचा एक-एक नवीन पायंडा पाडणारे पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा बँकेचे सर्वेसर्वा डॉ. अरुण निरंतर याही प्रकरणातून सही सलामत बाहेर पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान डॉ. अरुण निरंतर यांच्या पूर्णवादी बँकेतील मोगलाई कारभारामुळे त्रस्त असलेल्या बीड येथील रहिवासी अविनाश घिगे यांनी या प्रकरणात सहकार आयुक्त, पुणे आणि सहकार मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पूर्णवादी बँकेतील अनागोंदी कारभारा विषयी तक्रार केली आहे. त्यांनी पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेतील ८३ कोटीच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणी, ११ कोटी ०६ लाख १२ हजार ६४१ रुपयांच्या अवैध कर्ज माफी प्रकरणी, जालना येथील पंचमुखी वेअर हाऊसला बेकायदेशीरपणे दिलेल्या ०८ कोटी १२ लाख ९३ हजार कर्ज प्रकरणी तसेच ढांकलगाव, ता. अंबड, जि. जालना येथील एका गरीब शेतकरी महिलेच्या शेत जमीनीवर बेकायदेशीर पद्धतीने कोट्यवधीचा बोजा चढवून गरीब शेतकरी महिलेची जमीन हडपण्याचा कट रचल्या प्रकरणी डॉ. अरुण निरंतर आणि एकूणच पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळा विरुद्ध पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारी सोबत त्यांनी पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेतील कोट्यवधीच्या विविध घोटाळ्याचे पुरावे जोडले असून पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमण्याची विनंती शासनाकडे केली आहे.

जालना येथील वेअर हाऊस कर्ज वाटप प्रकरणातील कोट्यवधीच्या घोटाळ्यात पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या जालना शाखेचे व्यवस्थापक शिरीष देवळे यांचा बळी देवून कोट्यावधीच्या या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी आणि बँकेचे माजी अध्यक्ष तथा सर्वेसर्वा डॉ. अरुण निरंतर यांना या गुन्ह्यात आरोपी न करणे, अटक न करणे म्हणजे त्यांना परत बँक ठेवीदारांच्या ठेवींची अफरातफर करण्यासाठी मोकाट सोडणे होय, असे ही घिगे यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे.

घिगे यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केल्यानुसार पूर्णवादी बँकेच्या ठेवी दारांच्या ठेवी कर्जदारांना खिरापत म्हणून वाटणारे, बोगस पद्धतीने वाटलेले कर्ज बेकायदेशीरपणे माफ करणारे डॉ. अरुण निरंतरच जालना शाखेच्या ‘वेअर हाऊस’ तारण कर्ज घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत. डॉ. अरुण निरंतर यांच्या निर्देशानुसार बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी यांनी जालना शाखेचे व्यवस्थापक शिरीष देवळे यांनी पाठविलेल्या कर्ज प्रकरणाला मंजूरी दिली. सहकारी बँकेच्या नियमानुसार रक्कम रुपये एक लाख किंवा त्यापेक्षा अधिकच्या रक्कमेच्या कर्ज प्रकरणात बँकेच्या संचालक मंडळाची मंजूरी अत्यावश्यक ठरले.

अशा कर्ज प्रकरणात बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होऊन त्या बैठकीतच अशा कर्ज प्रकरणाला मंजूरी दिली जाते. तसेच मंजूरी देण्यापुर्वी अशा कर्ज प्रकरणाची संपूर्ण शहानिशा करण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असते. त्यानुसार या प्रकरणात ही पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने जालना येथील पंचमुखी वेअर हाऊसचे मालक रायचंद कुरंगळ यांच्याशी ‘बैठक’ करून ‘बोलणी’ करूनच त्यांना ०८ कोटी १२ लाख ९३ हजारांचे कर्ज मंजूर केले होते.

असे असतांना या प्रकरणात केवळ ‘पूर्णवादी’ बँकेच्या जालना शाखेचे व्यवस्थापक शिरीष देवळे यांना अटक करून बँकेच्या संचालक मंडळाला, अध्यक्षाला तसेच बँकेचे सर्वेसर्वा डॉ. अरुण निरंतर ह्यांना आरोपी न करणे, अटक न करणे म्हणजे बँक ठेवीदारांच्या ठेवीचा परत गैरवापर करण्यासाठी त्यांना मोकाट सोडणे होय. त्यामुळे या प्रकरणात त्यांना ही आरोपी करून बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करत बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी बीड येथील रहिवासी अविनाश घिगे यांनी सहकार मंत्र्यांकडे केली असल्याचे कळते.

या प्रकरणी सुभाष जोशी, डॉ. अरुण निरंतर यांच्या सोबतच बँकेचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद राजुरीकर, सर-व्यवस्थापक महेश पारगावकर, कर्ज वितरण अधिकारी जगताप यांच्यावर ही पोलीस कारवाई होणे अपेक्षीत होते. परंतु असे न होता एकट्या शिरीष देवळे यांना या प्रकरणात अडकवून ईतर सर्व मोठ्या माशांना बाहेर ठेवल्याने या संपूर्ण कारवाई विषयी शंका उपस्थित करत घिगे यांनी या प्रकरणी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे ही तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा

लक्षवेधी