मुंबई, दि. २८, (प्रतिनिधी) :- गोरेगाव दिंडोशी येथील स्काय व्हिला गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना तब्बल पाच वर्षांच्या संघर्षा नंतर भागधारक प्रमाणपत्र रुपी न्याय मिळाला. विकासकाने वाऱ्यावर सोडलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना आमदार प्रभू गोरे यांनी न्याय मिळवून दिला.
त्यामुळे शिवसेना, उद्धव बाळासाहेब गटाचे दिंडोशी, गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील प्रभू यांच्याच हस्ते या भागधारक प्रमाण पत्रांचे वितरण संबंधीत गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना करण्यात आले.
गोरेगाव दिंडोशी येथील स्काय व्हिला गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांना पाणी, लाईट यांसारख्या प्राथमिक गरजा पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा झगडावे लागत होते. विकासकाने मागील पाच वर्षांपासून त्यांना अशा मूलभूत सोयीसुविधा आणि भागधारक प्रमाणपत्रासाठी सुद्धा त्रस्त करून सोडले होते. आमदार सुनील प्रभू यांच्याकडे याबाबत तक्रार येताच त्यांनी विकासकाला ‘शिवसेना स्टाईल’ झटका देऊन त्याचे भान जाग्यावर आणले. तसेच प्रशासकीय यंत्रनांशी संवाद साधत ‘स्काय व्हिला’ च्या सभासदांना न्याय मिळवून दिला.
आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते भागधारक प्रमाण पत्र स्वीकारतांना अनेक सदस्य भावूक होऊन सुनील प्रभू यांचे आभार मानतांना दिसून आले. भागधारक प्रमाणपत्र स्वीकारतांना भावूक झालेल्या सदस्यांच्या भावना टिपत सुनील प्रभू म्हणाले की, “अजून लढाई बाकी आहे. आपली एकजूट अशीच राहू दे, आपल्याला अजून इमारतीची ‘ओसी’ मिळवायची आहे. यासाठी मी देखील आपल्या लढाईत बरोबर आहे. पण आपल्यातील ही एकी अशीच कायम राहणे आवश्यक आहे.”
यावेळी स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे, माजी महापौर विद्यमान नगरसेवक सुहास वाडकर, शाखाप्रमुख संपत मोरे व संदीप जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक तसेच स्काय विला गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन सुधाकर विंदे, सचिव स्मिता कनगुटकर, कार्यकारी सदस्य कमलेश देवणीका, लोकनाथ पांडे, सुधांशू खांडेकर, विना केलानी व गृहनिर्माण संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
