Friday, September 11, 2026
Homeशहरगुणवंत विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय कौतुक सोहळ्यात मुनगंटीवार, रेकावार यांच्या हस्ते १५३ विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय कौतुक सोहळ्यात मुनगंटीवार, रेकावार यांच्या हस्ते १५३ विद्यार्थ्यांचा सत्कार

सुधीर मुनगंटीवार, सपना ताई मुनगंटीवार, राहुल रेकावार यांचा समाज भूषण म्हणून सत्कार

छत्रपती संभाजीनगर, दि. ०९ [प्रतिनिधी] :- आर्य वैश्य समाज, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय कौतुक सोहळा दि. ०६ सप्टेंबर रविवार रोजी शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे संपन्न झाला. या कौतुक सोहळ्यात माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, सामाजिक अभ्यासक सपनाताई मुनगंटीवार, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सचिव राहुल रेकावार यांना ‘आर्य वैश्य मंडळ, छत्रपती संभाजीनगर’ चे कार्याध्यक्ष भास्करराव चौधरी, मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुरेश रुद्रवार यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

 

त्यानंतर या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून गुणवंतांच्या राज्यस्तरीय कौतुक सोहळ्याला प्रारंभ झाला. या कौतुक सोहळ्यात राज्याचा मागास भाग असलेल्या गडचिरोली पासून ते देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पर्यंतच्या सर्व भागातील आर्य वैश्य समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. राज्यभरातून आलेल्या आर्य वैश्य समाजाच्या १५३ गुणवंतांचे कौतुक राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, सामाजिक अभ्यासक सपनाताई मुनगंटीवार, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महाराष्ट्रचे सचिव राहुल रेकावार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाण पत्र देवून करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या कौतुक सोहळ्यात सुधीर मुनगंटीवार, सपना ताई मुनगंटीवार, राहुल रेकावार, कार्याध्यक्ष भास्कर चौधरी, अध्यक्ष अॅड. सुरेश रुद्रवार यांनी गुणवंत विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांनी केले. आभार मंडळाचे सह-सचिव प्रशांत अमिलकंठवार यांनी मानले. तर सूत्रसंचलन प्रेषित रुद्रवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, बालाजी येरावार, आशीष कोडगिरे, अनिल कौलवार, प्रेषित रुद्रवार, महेश बसेटवार, राजेश येरावार, सुरेश कमटलवार, राजेश चालीकवार, महेश चिद्रावार, विनय पाटील, प्रशांत गादेवार, आशीष लाभसेटवार, गोविंद केशवशेट्टी, गजानन गुंडावार, अनिल डूब्बेवार, बालाजी पांपटवार, ज्ञानेश्वर तगडपल्लेवार, अजय महाजन, प्रशांत अमिलकंठवार, नरेश ऱ्याकावार, प्रथमेश उत्तरवार आदींनी विशेष प्रयत्न केले.

सुधीर मुनगंटीवार यांच्या खुमासदार भाषण शैलीने सभागृह मंत्रमुग्ध 

या कौतुक सोहळ्यात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले मार्गदर्शनपर भाषण चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी आपल्या भाषणातून छत्रपती संभाजीनगरशी संबंधीत आठवणींना उजाळा देत विवाहा पुर्वीचे सांगितलेले किस्से सभागृहात हास्याचे कारंजे उडवत होते. त्यांची देहबोली, शब्द प्रयोग, किस्से, उदाहरणांची सांगड यातून विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्याने हसत-खेळत केलेल्या मार्गदर्शनाची अनुभूती आली. त्यांचे भाषण म्हणजे कुटुंबातील वडीलधाऱ्याने कुटुंबातील सदस्यांशी साधलेला संवाद होता. त्यांच्या भाषणाचा, संवादाचा मनमुरादपणे आनंद घेत संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाल्याचे पहावयास मिळाले.

हेही वाचा

लक्षवेधी