Monday, June 8, 2026
Homeशहरदेवानगरी-प्रतापनगर मध्ये कॉर्नर बैठका, जुन्याला संधी नको !

देवानगरी-प्रतापनगर मध्ये कॉर्नर बैठका, जुन्याला संधी नको !

छत्रपती संभाजीनगर, दि. २४ [प्रतिनिधी] :- महानगरपालिका निवडणूक प्रचार हळूहळू जोर धरत आहे. शहरातील ईतर प्रभागा प्रमाणेच प्रभाग १९ मध्ये ही राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते गळ्यात गमच्छे घालून दारोदार फिरत असतांना दिसून येत आहेत. २०१५ नंतर थेट आत्ताच दारात येत असलेल्यांविषयी मनस्ताप झालेल्या या प्रभागातील मतदारांनी आप-आपल्या भागात कॉर्नर बैठका घेत ‘काहीही झाले तरी जुन्याला संधी नको….’ असा पवित्रा घेतला असल्याचे कळते.

प्रभाग १९ चा भाग असलेल्या देवानगरी, शाहनुरवाडी भागात मागील दोन दिवसांपासून मतदारांच्या कॉर्नर बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये प्रभागातील रहिवाशांच्या समस्या, अडचणी लक्षात घेवून मदतीला कोण येतो, पाण्याचा प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असो, सुरक्षेचा प्रश्न असो याबाबत सजग राहून मदतीला कोण ऊभा राहतो, या बाबीचा विचार करून मतदान करण्याचा आणि प्रभागातील मतदारांना हेच लक्षात घेवून मतदान करण्यास सांगण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कळते.

देवानगरी भागातील देशी दारूच्या दुकानामुळे, दारुड्यांच्या धिंगाण्यांमुळे या भागातील रहिवासी त्रस्त होते. या भागातून ये-जा करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे ते देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे म्हणून परिसरातील रहिवासी मागणी करत. तरी स्व ‘हिताला’ प्राधान्य देणाऱ्या नगरसेविका पुत्राला रहिवाशांच्या सुरक्षेचा विचार करावासा वाटला नाही. अखेर या विषयात रहिवाशांनीच उत्स्फूर्त उठाव केला आणि ते देशी दारूचे दुकान बंद पाडले. तसेच आता मतदारांच्या समस्यां ऐवजी, मतदारांच्या सुरक्षे ऐवजी आपले ‘हीत’ महत्वाचे मानणाऱ्याचे दुकान ‘निवडणूक ही नांदी आहे, मुजोरांना हाकलण्याची हीच एक संधी आहे….’ म्हणत बंद पाडायचे, असा संकल्प या बैठकांमध्ये करण्यात आला असल्याचे या भागातील सजग मतदारांनी सांगितले.

एकीकडे गळ्यात पट्टे घालून “परत मते द्या, परत संधी द्या….” म्हणत माजी नगरसेविका पुत्र फिरत असतांनाच मतदार कॉर्नर बैठका घेवून असा प्रण करत आहेत. यामध्ये महिला मतदारांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. महिलांच्या बीसी ग्रुप मधून, बचत गट ग्रुप मधून ही असाच प्रचार सुरू असल्याचे कळते. त्याच प्रमाणे विविध व्हाटस-अप ग्रुप मध्ये अशा चर्चा घडवून जाहीरपणे ‘माजी नको….’ असा प्रण व्यक्त करण्यात येत असल्याचे ही कळते. राजकीय, सामाजिक लढ्याचे केंद्र बिंदु असलेल्या क्रांती चौकाशी निगडीत प्रभाग १९ मध्ये आपला नगरसेवक ठरविण्यासाठी मतदारांनी सुरू केलेला हा प्रकार म्हणजे एक प्रकारची सामाजिक, राजकीय उत्क्रांतीच होय, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

हेही वाचा

लक्षवेधी