Monday, June 8, 2026
Homeशहरटक्केवारीचे राजकारण संपविण्यासाठी, प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात - मीनाक्षी उपगनलावार

टक्केवारीचे राजकारण संपविण्यासाठी, प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात – मीनाक्षी उपगनलावार

चंद्रपूर, दि. २४ [प्रतिनिधी] :- आज संपूर्ण राजकीय व्यवस्था टक्केवारीच्या राजकारणाने बरबटली असून यामुळे समाजसेवेचे माध्यम असलेल्या राजकारणाला धंद्याचे स्वरूप आले आहे. हे सगळे चित्र बदलल्याशिवाय वार्डाचा, प्रभागाचा, शहराचा विकास होणार नाही. याचाच विचार करून महानगरपालिका निवडणुकीत उतरत असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी उपगनलावार यांनी वडगाव प्रभाग क्रमांक ०८ मधून भाजप कडून निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे.

मागील २५ वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीरे आयोजित करणे, शाळा, रुग्णालयांमध्ये फळे, भेटवस्तू वाटप करणे, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, काही गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने त्यांच्या पालकांना अर्थसाह्य करणे, उद्यमी तरुणांना व्यवसायासाठी, उद्योगधंद्यासाठी मदत करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणे, स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस तसेच स्थानिक प्रशासनाकडे विविध विषयांचा पाठपुरावा करणे अशा सामाजिक कार्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वत:ला वाहून घेतले आहे.

सामाजिक कार्याचा हा वारसा त्यांना त्यांच्या वडील बंधू कडून लाभल्याचे त्या सांगतात. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे घेवून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचे कार्य त्यांचे बंधू राजेश शंकरराव गंगमवार करत असत. पण दुर्दैवाने डेंग्यूमुळे त्यांच्या भावाचे अकाली निधन झाले. भावाचे राहिलेले समाजकार्य पुढे नेण्याची इच्छा आपली असल्याचे सांगत मीनाक्षी उपगनलावार यांनी जनतेच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक स्वच्छतेच्या प्राथमिक गरजेकडे सुद्धा राजकारणी, अधिकारी लक्ष देण्यास तयार नसतात याकडे लक्ष वेधले. त्यांच्या प्रभागातील अशाच एका ज्वलंत विषयासाठी त्या मागील काही वर्षांपासून झटत आहेत. पण सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा त्या विषयाकडे लक्ष देण्यास ना मनपा प्रशासन तयार आहेत, ना पोलीस प्रशासन तयार आहे.

त्यांच्या मते सामान्य नागरिकांच्या अशाच अनेक समस्या आहेत, ज्या आजच्या राजकारण्यांना महत्वाच्या वाटत नाहीत. राजकारण्यांना फक्त टक्केवारीच्या कामात स्वारस्य असते, जनतेच्या सेवेत नाही. याचा गैरफायदा अधिकारी घेतात आणि त्यामुळे शहर, शहरवासीय अस्वच्छतेच्या, असुरक्षीततेच्या विळख्यात सापडतात. त्यातून काही अप्रिय घटना घडतात. हे सगळे चित्र बदलावयाचे असेल तर आधी टक्केवारीचे राजकारण बंद पाडले पाहिजे आणि हे टक्केवारीचे राजकारण बंद पाडण्याचे, नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे, नागरिकांच्या सुदृढ आणि सुरक्षित आयुष्यासाठी प्रशासनाला धारेवर धरण्याचे धाडस माझ्यात आहे, हे मतदार जाणून आहेत. त्यामुळे शेकडो बंधू, भगिनी माझ्या पाठीशी असतात. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात तसेच मनपा, पोलीस प्रशासनाकडे काही प्रश्नांचा पाठपुरावा करतांना सर्व जाती-धर्माचा जमाव माझ्या सोबत असतो, असे सांगत त्यांनी वडगाव प्रभाग क्रमांक ०८ मधून भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे.

“लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मी आणि माझे पती अहोरात्र झटलो. पक्ष वाढीसाठी, पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी मी आणि माझे कुटुंबीय आर्थिक झळ सहन करत पूर्ण ताकदीने झटतात, याबाबीचा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, माझ्या सामाजिक कार्याचा, माझ्या पाठीशी असलेल्या जनाधाराचा विचार करून पक्षाने मलाच उमेदवारी द्यायला हवी,” असे त्या म्हणतात.

हेही वाचा

लक्षवेधी