छत्रपती संभाजीनगर, दि. १६ [प्रतिनिधी] :- महानगरपालिका निवडणूक मतमोजणी केंद्रांवर शिवसेनेचे माजी महापौर तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निकटवर्तीय विकास जैन यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना आज सकाळी घडली. एखाद्या गुंडाला घेरुण मारावे, तशी मारहाण विकास जैन यांना भाजपच्या स्थानिक नेत्याच्या ईशाऱ्या वरुन करण्यात आली असून या प्रकाराने भाजप विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
भारतीय जनता पार्टी कडून विरोधकांविरुद्ध, टिकाकारांविरुद्ध सातत्याने होत असलेल्या सत्तेच्या दुरुपयोगाचा, पोलीस बळाच्या दुरुपयोगाचा हा आणखीन एक पुरावा ठरला आहे. दि. १५, शुक्रवार रोजी राज्यभरातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान झाले. आज पहाटेच मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या १८, १९, २०, २१, २२, २७ या प्रभागांची मतमोजणी रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात होत आहे. या मतमोजणीला शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून माजी महापौर विकास जैन उपस्थित होते.
मतमोजणी केंद्रात प्रवेश करत असतांनाच भाजप स्थानिक नेत्याच्या ईशाऱ्यावरुन त्यांना मतमोजणी केंद्राच्या प्रवेश द्वारावरच पोलिसांनी अडविले. यावरून पोलिसांत आणि त्यांच्यात वाद झाला. पोलिसांकडून हेतुपूरस्करपणे विकोपाला नेण्यात आलेल्या या वादाचे रूपांतर विकास जैन यांच्यावरील पूर्वनियोजित लाठी हल्यात झाले. पोलिसांनी विकास जैन यांना एखाद्या गुंडा सारखे घेरुण मारले. एका भाजप स्थानिक नेत्याने पोलिसांकरवी विकास जैन यांना केलेल्या या मारहानीचे छायाचित्रे, चलचित्रे सामाजिक प्रसार माध्यमांवर शेअर करत नेटकऱ्यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली. या लढती दरम्यान ही भाजपच्या वतीने सत्ताधारी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांसह, कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे [उबाठा] पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध तसेच सामाजिक प्रसार माध्यमांवर लिखाण करून भाजपच्या भ्रष्ट उमेदवारांना अडचणीत आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध ही सत्तेचा, पोलीस बळाचा दुरुपयोग राजरोसपणे करण्यात आला.
पालकमंत्री संजय शिरसाट यांचे ठिय्या आंदोलन; मतमोजणी थांबली
विकास जैन यांच्यावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या या पूर्वनियोजित लाठी हल्याच्या निषेधार्थ पालकमंत्री संजय शिरसाट, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, विजय वाघचौरे, सत: विकास जैन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील मतमोजणी केंद्रासमोर ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत हा लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात येणार नाही, तोपर्यंत मतमोजणी करू देणार नाही; अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
भाजपच्या स्थानिक नेत्याच्या ईशाऱ्यावरुन पोलिसांनी विकास जैन यांच्यावर केलेल्या या लाठीहल्याने आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. निवडणूक काळात तसेच मतदानाच्या दिवशी ही भाजप कडून विरोधकांविरुद्ध, सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध करण्यात आलेल्या सत्तेच्या दुरुपयोगाने संभाजीनगरकरांच्या मनात नाराजी पसरली. त्यातच आता मतमोजणी केंद्रावर शिवसेनेच्या नेत्याला करण्यात आलेल्या या लाठी हल्याने संभाजीनगरकरात भाजप विषयी असंतोषाची लाट पसरत आहे.
