छत्रपती संभाजीनगर, दि. १८ [प्रतिनिधी] :- ‘देवाभाऊ कॅम्पेन’ मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळ्या रंगाने मिटवून शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार शहरातील काही भागात घडला असून शिवरायांचा अकल्पित असा हा अवमान भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनीच केला असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार्पण करत अभिवादन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या जाहिराती प्रकाशित करून, प्रसारित करून देवेंद्र फडणविसांची ‘देवाभाऊ’ प्रतिमा ऊभा करणारा कोण? विरोधकांच्या टीकेनंतर ‘देवाभाऊ’ कॅम्पेन मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला, शिवमुद्रेला काळे फासणारा कोण? असा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम जनतेला पडला होता. या प्रश्नाचे उत्तर “आपणच केले….” अशा शब्दांत भाजपच्या शहर-जिल्हाध्यक्षाने दिल्याने भाजपचे बेगडी शिवप्रेम उघड झाले आहे.
‘देवाभाऊ’ विरोधकांविषयी मराठा समाजामध्ये, शिवप्रेमींमध्ये, राज्यभरातील मतदारांमध्ये तिरस्कार निर्माण करण्यासाठी ‘देवाभाऊ’ कॅम्पेन मधील शिवरायांच्या प्रतिमेला भाजपनेच काळ्या रंगाने मिटविल्याची ही कबुली म्हणजे भाजपने शिवरायांना ही सत्तेच्या सारीपाटावर लावल्याचे प्रमाण होय. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घृणास्पद राजकारणाची ही लांच्छनास्पद सुरुवात भाजपनेच केल्याचे ‘व्हाटस-अप चाट’ स्वरूपातील सबळ पुरावे ‘दैनिक जनजागृती’ च्या हाती लागले आहेत. मराठा समाजाचाच असलेल्या भाजप शहर-जिल्हाध्यक्षानेच हा घृणास्पद प्रकार केल्याचे यातून उघड होत असल्याने मराठा समाजाच्या, एकूणच महाराष्ट्राच्या मनावर आघात झाला आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लीन होत शिवरायांना पुष्पार्पण करत अभिवादन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या पान-पानभर जाहिराती वर्तमान पत्रातून प्रकाशित करण्यात आल्या होत्या. वृत्त वाहिन्यांमधून प्रसारित करण्यात आल्या होत्या. राज्यभरातील प्रमुख शहरात ‘देवाभाऊ’ चे मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले होते. छोट्या-मोठ्या शहरातील भिंतींवर ही या जाहिराती करण्यात आल्या होत्या. यातून कुण्यातरी अज्ञाताकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवरायांचे ‘देवाभाऊ’, मराठ्यांचे ‘देवाभाऊ’ अशी प्रतिमा उभी करण्यात आली. यासाठी सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यभरात खास ‘देवाभाऊ’ कॅम्पेन राबविण्यात आले.

या जाहिरातींवरून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात बऱ्याच उलट-सुलट चर्चा त्यावेळी रंगल्या. विरोधकांकडून ह्या जाहिराती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी त्यांच्या समर्थकांकडून दिल्याचे आरोप करण्यात आले. तर भाजपच्या वतीने सदर जाहिरातींशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले.
या जाहिरातींमध्ये एकट्या देवेंद्र फडणविसांच्या प्रतिमेचा वापर करण्यात आल्याने काही भाजप समर्थकांनी “ही जाहिरात कुणाला खिजवण्यासाठी….?” असा प्रश्न उपस्थित करत सामाजिक प्रसार माध्यमांवर चर्चा घडवून आणल्या. वृत्तवाहिन्यांवर ही याच अनुषंगाणे “या जाहिरातीतून देवेंद्र भाजपला फडणवीस हे मोदी, शाहांपेक्षा ही मोठे झाले आहेत…मोदींनंतर फडणवीसच…असे तर सूचित करायचे नाही ना….?” अशा चर्चा झडल्या.
तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी, “देवाभाऊला शेतकऱ्यांचे दु:ख दिसत नाही….” अशा शब्दांत या जाहिरातींवर चिमटा घेतला होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही, “त्या जाहिरातीत ना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे फोटो आहेत, ना भाजपचे पक्ष चिन्ह आहे, ना शेतकऱ्यांप्रतीचा जिव्हाळा आहे. राज्यात ओला दुष्काळ पडला असतांना मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्याऐवजी अशा जाहिरातीतून स्वत:ची ‘देवाभाऊ’ म्हणून प्रतिमा ऊभी करण्यात मग्न आहेत; काय बोलावे….?” असे भाष्य करत फडणविसांवर टीका केली होती.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा सोडविण्यात देवेंद्र फडणविसांना आलेले यश, मराठा समाजाप्रती फडणविसांची आपुलकी अधोरेखित करण्यासाठी भाजपच्या वतीने राबविण्यात आलेले ‘देवाभाऊ’ कॅम्पेन अशा प्रकारे अंगलट येत असल्याचे पाहून भाजपतील उलट्या काळजाच्या नेत्यांनी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी प्रमुख शहरातील भिंतींवर रेखाटलेल्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीतील शिवरायांच्या प्रतिमेला स्वत:च काळ्या रंगाने मिटवायचे आणि हे पाप शरद पवार यांच्या विचारांच्या मराठा कार्यकर्त्यांनी केल्याचे भासवत शिवप्रेमींमध्ये, महाराष्ट्रजनांमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, मराठा आंदोलक यांच्या प्रती तिरस्कार निर्माण करायचा; असे षडयंत्र रचले.

त्यानुसार मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी प्रमुख शहरातील भिंतींवरील ‘देवाभाऊ’ जाहिरातीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळ्या रंगाने पुसण्याचे पाप सुरू झाले. ‘दैनिक जनजागृती’ च्या हाती लागलेल्या पुराव्या नुसार पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे पाप केले, स्वत: भाजप पदाधिकाऱ्यांनी. “देवेंद्र फडणविसांविषयी द्वेष भावना ठीक आहे; पण जनमानसातील त्यांची प्रतिमा पुसण्यासाठी विरोधक या स्तराला जातील असे स्वप्नातही वाटले नव्हते….” म्हणत हे पाप मारले विरोधकांच्या माथी! महाराष्ट्राला चीड आणणारे हे संतापजनक कृत्य शरद पवार यांच्या विचारांच्या मराठा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असल्याचे चित्र रंगविण्यात आले. सामाजिक प्रसार माध्यमांवर तशा चर्चा घडवून शरद पवार यांच्यासह शरद पवार यांच्या विचारांच्या मराठा कार्यकर्त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात ऊभे करण्यात आले.
त्यातून भाजप मतदारांमध्ये स्वत: विषयी आपुलकीची, विरोधकांविषयी रोषाची भावना अधिक तीव्र करून घेण्यात आली. काठावरचे मतदार ही आपल्याकडे वळवून घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या यशाची बांधणी करण्यात आली. हा सगळा प्रकार म्हणजे सत्तेची अघोरी भूख क्षमविण्यासाठी, विरोधकांना संपविण्यासाठी थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाच सत्तेच्या सारीपाटावर लावण्याचे पाप होय !
धक्कादायक म्हणजे, मराठा समाजाच्या असलेल्या भाजपच्या छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी हे पाप केले असून याची कबुली ही त्यांनी, “आपणच केले….” अशा शब्दांत दिली आहे. राजकारणाचा भाग म्हणून राज्यातील महत्वाच्या शहरांप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरात ही भाजपच्या वतीने ‘देवाभाऊ’ जाहिरातींमधील शिवरायांच्या प्रतिमेला काळ्या रंगाने पुसण्यात आले. ही बाब भाजपच्या सामान्य, सच्चा कार्यकर्त्यांना, शिवप्रेमींना जिव्हारी लागली. त्यांनी हा प्रकार थांबावा म्हणून हा विषय भाजप शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना “दादा, आपल्या देवाभाऊ कॅम्पेन मधील चित्र काल पर्यंत व्यवस्थित होते. पण आज या चित्रातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कोणीतरी काळे फासले….” असा ‘टेक्स्ट मॅसेज’ तसेच ‘व्हाटस-अप मॅसेज’ करून कळविले. त्यावर शितोळे यांनी “आपणच केले….” असे धक्कादायक उत्तर दिले.
भाजपच्या अंतर्गत कलहातून ‘दैनिक जनजागृती’ च्या हाती लागलेले दि. २७ डिसेंबर २०२५ रोजीचे हे संवाद [‘व्हाटस-अप चाट’] म्हणजे, सत्तेच्या हव्यासातून भाजपने केलेल्या पापाचे सबळ पुरावे होय. तरी भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी शिवरायांच्या प्रतिमा काळ्या रंगाने मिटवून केलेल्या या हीन राजकारणाशी भाजपचा संबंध आहे की नाही….? या गोष्टीची पुष्टी ‘दै. जनजागृती’ करत नाही.
त्यामुळे या वृत्ताच्या माध्यमाने शितोळे यांच्या अधम राजकारणाचे उघड झालेले हे पुरावे पाहून त्यांच्या विरुद्ध स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, शिवप्रेमी काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
याबाबत जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना व्हाटस-अप वर संपर्क साधून याबाबत त्यांची प्रतिक्रिया, स्पष्टीकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांनी व्हाटस-अपवर ही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
दरम्यान या बाबत राष्ट्रवादी कॉँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे मत जाणून घेण्याच्या हेतूने त्यांना संपर्क साधण्यात आला असता त्यांनी यावर, “भाजप कुणालाही सत्तेच्या सारीपाटावर लावू शकते. आम्ही आधी पासूनच ‘देवाभाऊ कॅम्पेन’ विषयी प्रश्न उपस्थित करत होतो. पण राजकीय गुन्ह्यात तरबेज असलेल्या भाजप नेत्यांच्या चलाखीमुळे या विषयात आमच्या हाती ठोस असे पुरावे नव्हते. मी सध्या अजित दादांच्या अकाली जाण्याने व्यथित आहे. पुढील आठवड्यात भेटू. या विषयावर पत्रकार परिषद घेऊ,” अशी प्रतिक्रिया दिली.
