चंद्रपूर, दि. ०८ [प्रतिनिधी] :- ‘पार्टी वूईथ डिफरन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या इतिहासातच कधी ही झाला नसेल असा गोंधळ महानगरपालिका उमेदवारी निश्चिती बाबत चंद्रपूर भाजप मध्ये झाला. आमदार किशोर जोरगेवार आणि शहराध्यक्ष सुभाष कासनगट्टूवार यांनी ‘अर्थपूर्ण’ हेतूने घातलेल्या या गोंधळाची पावती म्हणून महानगरपालिका निवडणुका होताच भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचा यथोचित ‘सत्कार’ करत त्यांना ‘प्रसाद’ देण्यात येणार असल्याची चर्चा चंद्रपूर शहरात रंगत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या वतीने भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि शहराध्यक्ष सुभाष कासनगट्टूवार यांच्याकडे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची प्रमुख जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाने त्यांच्याकडे दिलेल्या जबाबदारीचा गैरफायदा घेत त्यांनी पक्षाच्या ‘एबी फॉर्म’ वाटपात गैरव्यवहार केला. यामुळे चंद्रपूर भाजपतील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. अपात्र, अयोग्य कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या देण्यात आल्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या विजयाच्या श्यक्यता धूसर झाल्या. पक्षश्रेष्ठींनी ज्या इच्छुकांसाठी ‘एबी फॉर्म’ दिले होते, त्या इच्छुक कार्यकर्त्यांना ‘एबी फॉर्म’ न देता ईतरांना ‘एबी फॉर्म’ देण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.
पक्ष निरीक्षकांसह थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही याच्या झळा सहन कराव्या लागल्या. यानुषंगाने ‘एबी फॉर्म’ वाटपातील हा गैरव्यवहार म्हणजे ‘भय-भूक-भ्रष्टाचार मुक्त भारत’ असे आश्वासन देत भ्रष्टाचारा विरुद्ध मोहीम सुरू करणाऱ्या भाजपनेच भारतात भ्रष्टाचाराच्या नव्या प्रकारास जन्म देणे होय, अशा चर्चा प्रसार माध्यमातून झडल्या.
राज्यात चालणाऱ्या, घडणाऱ्या राज्य व्यापक कार्याच्या अनुषंगाणे, घडामोडींच्या अनुषंगाणे ‘चांदा ते बांदा’ असा उल्लेख केल्या जातो. ‘चांदा ते बांदा’ या वाक्य प्रचारातील चांदा म्हणजे, चंद्रपूरात हा प्रकार घडल्याने भाजपत झालेल्या या आगळ्या-वेगळ्या भ्रष्टाचाराची लागण भाजपत ‘चांदा ते बांदा’ होऊ नये म्हणून निवडणुका होताच हा गैरव्यवहार घडवून आणणाऱ्या किशोर जोरगेवार यांचा यथोचित ‘सत्कार’ करण्याचा निश्चय निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलल्या जात आहे.
किशोर जोरगेवार यांच्या या ‘सत्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्या सरस्वती दास यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, “आमदार जोरगेवार यांनी माजी शहराध्यक्ष कासनगट्टूवार यांच्या माध्यमाने वीस-वीस लाख रुपये घेवून पक्षाचे ‘एबी फॉर्म’ विकले. जोरगेवार यांनी पक्षाच्या विजयापेक्षा आपले घर भरण्याला महत्व देत अपात्र कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकांप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकी मध्ये ही भाजपचा पराभव होणार असल्याचे दिसून येत आहे. जोरगेवार यांनी भाजप संपविण्याचा रचलेला हा घाट आमच्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते कधीच सहन करू शकत नाही. ऐन निवडणुकीत पक्षांतर्गत वितंडवाद नको म्हणून आम्ही शांत आहोत. पण निवडणुका होताच आम्ही त्यांचा यथोचित ‘सत्कार’ करून त्यांना चांगलाच ‘प्रसाद’ देणार आहोत.
