Monday, June 8, 2026
Homeशहरजन्मदात्या आईनेच घेतला ११ वर्षीय मुलाचा जीव

जन्मदात्या आईनेच घेतला ११ वर्षीय मुलाचा जीव

पुणे, दि. २७ [संतोष फुटाणे] :- भौतिक सुखामागे धावत असलेले जग, त्यातून वाढलेली धावपळ, ताणतणाव, नैराश्य यातून हिंस्त्र होत चाललेल्या समाजाचे प्रमाण देणारी आणखीन एक घटना पुण्याच्या वाघोली भागात घडली असून काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत जीवनात आलेल्या नैराश्यातून एका जन्मदात्या मातेनेच आपल्या पोटच्या मुलाचे आयुष्य संपविल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील जायभाय कुटुंबीय रोजगाराच्या दृष्टीने पुण्यातील वाघोली परिसरात वास्तव्यास आले होते. रोजनदारी करून आपला उदरनिर्वाह भागविणाऱ्या सोनी संतोष जायभाय यांना दोन अपत्य होती. आर्थिक विवंचनेमुळे रोज होणाऱ्या वादाला कंटाळून सोनी जायभाय ह्या पती संतोष जायभाय यांच्या पासून वेगळ्या राहत. तरी पतीकडून त्यांना मानसिक, शारीरिक त्रास होत असे.

याच संतापातून त्यांनी त्यांच्या पोटच्या मुलाची [साईराज जायभाय, ११] निर्घुण हत्या केल्याचे समोर आले आहे. दि. २६, सोमवार रोजीच्या रात्री साईराज गाड झोपेत असतांना आरोपी सोनी जायभायने त्याच्या पोटात, मानेवर धारधार शस्त्राने सपासप वार करून त्याचे जीवन संपविले. तसेच १३ वर्षीय मुलीवर ही प्राणघातक वार करून तीचे ही जीवन संपविण्याचा कुप्रयास केला. परंतु सुदैवाने मुलगी बचावली. मुलीच्या आरडाओरड करण्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि पुढील अनर्थ टळला.

जमलेल्यांपैकी काहींनी पोलिसांना संपर्क साधून पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेवून आरोपी सोनी जायभायला अटक केली. जखमी मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी