मुंबई, दि. २७ [प्रतिनिधी] :- प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भाषणा दरम्यान अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राहिल्याने वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी गिरीश महाजनांवर जाहीर टिका करत तीव्र आक्षेप घेतला होता.
पाहता-पाहता या प्रकरणाला राजकीय वळण लागले. राज्यातील काही शहरात गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर महाजन यांच्यावर जाहीर टिका करणाऱ्या माधवी जाधव यांच्यावर विशिष्ट लोकांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. दरम्यान या प्रकरणात उडी घेत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी गिरीश महाजनांविरुद्ध अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी, “मंत्री गिरीश महाजन यांनी घडल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी मागितली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर पडदा टाकला पाहिजे. त्यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या चुकीला अधिक ताणण्यात अर्थ नाही. तसेच हा सगळा प्रकार उघडकीस आणून त्यास कडाडून विरोध करणाऱ्या माधवी जाधव यांचा सत्कार केला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया दिली.
