Monday, June 8, 2026
Homeलेख'उधळलेला वारू रोखण्यासाठी तिन्ही सेना एकत्र याव्या'

‘उधळलेला वारू रोखण्यासाठी तिन्ही सेना एकत्र याव्या’

मुंबई करांच्या भावना

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष [भाजप] ने जे कृत्रिम यश प्राप्त केले; त्यावरून संपूर्ण राज्यभरात ‘कोणत्याही पक्षाला असे आसुरी बहुमत मिळणे हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक असते….’ अशा चर्चा वृत्तवाहिन्यांवर, सामाजिक प्रसार माध्यमांवर तसेच गल्लोगल्ली रंगत आहेत. त्यातल्या त्यात मतांचे हे कृत्रिम तांडव घडवून आणण्यासाठी काही महानगरपालिकांमध्ये भाजपने जे हातखंडे वापरले त्यावरूनही मतदारांमध्ये असंतोषाची लाट उसळत आहे.

निवडणुका म्हणजे मासेमारीचा मोसम, असे आकलन करून निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी भावनिक गळ, काही ठिकाणी जातीय ध्रुवीकरणाचा गळ, काही ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरणाचा गळ तर काही ठिकाणी पैशांचा गळ मतदारांना लावून भाजपची ही घोडदौड सुरू आहे. अत्यंत वाईट म्हणजे, यासाठी थेट पोलीस प्रशासनाचा, निवडणूक प्रशासनाचा वापर करत भाजप मतांचे हे कृत्रिम दान मिळवत आहे. भाजपला मतदान होत नसून भाजप मते ‘घेत’ आहे, हेच यातून सिद्ध होत आहे….!

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसला भाजपने दिलेली धोबीपछाड, २९ महानगरपालिकांपैकी तब्बल २२ महानगरपालिकांमध्ये [त्यातल्या-त्यात पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा] शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला एका ही जागी विजय न मिळणे केवळ पवारांच्याच दृष्टीने नाहीतर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे. कोणत्याही पक्षाचे एक किमान ठराविक मते असतात; ती मते ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मिळू नयेत….हे कसे श्यक्य आहे…? पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांची नावे आदर्श विकासाची शहरे म्हणून घेतली जातात. पवारांचे विरोधकही या शहरांच्या आदर्श विकासाचे श्रेय्य पवार कुटुंबीयांना देतात. पण तिथे सुद्धा शरद पवारांच्या पक्षाचा एक ही उमेदवार विजयी होऊ शकला नाही; हे आश्चर्यच…

हा सगळा ‘चमत्कार’ कसा घडून आला….याबबतच्या एक-एक सुरस कथा वजा घटना आता समोर येत असून त्यातून भाजपचे ‘निवडणुका म्हणजे मासेमारीचा मोसम’ हे धोरण, ही धारणा उघड होत आहे….! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आमदार, भाजप मंत्र्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, पोलीस वाहनातून वाटलेल्या पैशाचा पुरावा देणारी ‘ऑडिओ क्लिप’ भाजपच्या नैतिकतेचे धिंडवडे काढत आहे…!!

कुठे जातीय समीकरणाचे, कुठे धार्मिक तेढाचे तर कुठे पैशाच्या महापुराचे आयुध वापरुनही एकहाथी सत्ता न मिळालेल्या महानगरपालिकांमध्ये तर सत्तेसाठी हापापलेल्या या तथाकथित तत्ववादी पक्षाने दोन महानगरपालिकांमध्ये थेट ‘एमआयएम’शी ही ‘निकाह’ केला आहे. 

विशेष म्हणजे, मुस्लिमांविषयी, एमआयएम विषयी गरळ ओकल्याशिवाय झोप न येणाऱ्या भाजप पक्ष कार्यकर्त्यांनी, भाजप पाठीराख्यांनी, भाजप सोशल मिडिया वॉरियरनी हा ‘निकाह’ कबूल ही केला आहे. आपल्या अनुयायांच्या गळी एवढी ‘महान’ बाब उतरविण्यात भाजपला आलेले हे यश एखाद्या आतंकवादी संघटनेला आतंकवाद्यांचे ब्रेन वॉश करण्यात येणाऱ्या यशाच्या तोडीचे आहे; असे म्हटल्यास वावगे ठरू नये….!

लोकशाहीला घातक अशा बेफाम उधळलेल्या वारूला रोखण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी एकत्र यावे; अशी साद मुंबईकर घालत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर पदावरून भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेचीची पार्श्वभूमी यास असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पॅटर्न राबवून बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर पद या तिन्ही सेनांनी एकत्र येवून आपल्याकडे राखत भाजपरूपी उधळलेल्या वारूला वेसण घालावी, अशी आर्त हाक मुंबईकर देत आहेत.

नितीन तोरस्कर….🖋️
ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

 

 

 

हेही वाचा

लक्षवेधी