मुंबई, दि. ०५ [प्रतिनिधी] :- बिनविरोध निवडणूक जिंकण्याचा पॅटर्न राज्यात सध्या चांगलाच गाजत असून या बिनविरोध पॅटर्नने उद्धव बाळासाहेब ठाकरे [उबठा] पक्षाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत निवडणुकी पुर्वीच पराभवाच्या खाईत ढकलले आहे. राज्याच्या २९ महानगरपालिकांच्या मतदानावर परिणामकारक ठरणाऱ्या या बिनविरोध पॅटर्न मध्ये भाजप-सेना युतीला ठाकरेंचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांनीच साथ दिल्याचे समोर आले असून उद्धव ठाकरेंसाठी हे घर फिरले की घराचे वासे ही फिरतात, याची प्रचिती देणारे ठरत आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीचा पायंडा महानगरपालिका निवडणुकीत पडून महायुतीचे ७० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. बहुमतासाठी ६१ चा आकडा लागणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध पद्धतीने निवडून आलेल्या युतीच्या नगरसेवकांची संख्या २० आहे. त्यामुळे निवडणुकी पुर्वीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असल्याचे बोलल्या जात आहे.
राज्यातील राजकारणात आपले अस्तित्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना महायुतीच्या बिनविरोध निवडणूक पॅटर्न ने चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे या बिनविरोध पॅटर्न विरोधात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून सातत्याने भाष्य करण्यात येत आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांनी माघार का घेतली? यासाठी त्यांच्यावर कोणी दबाव टाकला? याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी झाडाझडती घेतली असता यामागे ठाकरे गटाचे कल्याण-डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष तात्या माने आणि त्यांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई असल्याचे पुरावे उद्धव ठाकरे यांच्या हाती लागले असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ. पण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवारांना जिल्हाध्यक्ष तात्या माने यांनी संपर्क साधत, “वरुण सरदेसाई यांचा आदेश आहे, निवडणुकीतून माघार घ्या….” असे सांगितल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आधी एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ठाकरेंना राज्याच्या राजकारणातून बाद केले आणि आता थेट उद्धव ठाकरे यांच्या घरातीलच माणूस फोडून उद्धव ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ही धोबीपच्छाड दिला, अशी चर्चा रंगत आहे.
जे कल्याण-डोंबिवलीत घडले, तेच छत्रपती संभाजीनगरात घडणार !
बहुमतासाठी ६१ चा आकडा आवश्यक असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत युतीचे २० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत युतीच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकी प्रमाणेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ही ‘घर का भेदी लंका ढाये…’ हा पॅटर्न राबवून छत्रपती संभाजीनगरात विजय मिळविण्याची रणनीती भाजपने आखली असल्याचे कळते.
याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या एका नेत्याने माजी खासदार तथा ठाकरे सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा विरोध डावलून माजी महापौर रशीद मामू यांना उमेदवारी देणे, अनेक प्रभागांमध्ये ज्यांना राजकीय गंध नाही, ज्यांचे राजकीय अस्तित्व नाही अशांना उमेदवारी देणे असे प्रकार केले असल्याचे बोलल्या जात आहे. एवढेच नव्हेतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या ‘त्या’ नेत्याने अनेक उमेदवारांना “प्रचारात फारकाही लक्षं घालू नका….” असा ‘निरोप’ ही दिला आहे. त्यामुळेच मतदानाला अवघे १० दिवस बाकी असून अनेक प्रभागात ठाकरे गटाच्या प्रचाराची ‘मशाल’ अद्याप ही पेटली नसल्याचे बोलल्या जात आहे.
