Tuesday, July 28, 2026
Homeराजकीयमुनगंटीवारांच्या सादेला पंकजा मुंडेंचा प्रतिसाद : चंद्रपूरच्या प्रदूषणावर सरकार 'ॲक्शन मोडवर'

मुनगंटीवारांच्या सादेला पंकजा मुंडेंचा प्रतिसाद : चंद्रपूरच्या प्रदूषणावर सरकार ‘ॲक्शन मोडवर’

मुंबई, दि. २५ (नितीन तोरस्कर) :- विकासा सोबतच चंद्रपूरकरांच्या आरोग्याची काळजी वाहत चंद्रपूरच्या प्रदूषण विषयाकडे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे लक्ष सातत्याने वेधणाऱ्या माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सादेला प्रतिसाद देत पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत प्रदूषण नियंत्रण आराखडा जाहीर केला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या सत्रात चंद्रपुरात वाढत्या प्रदूषण विषयावर बोलतांना त्यांनी, “चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी ‘शॉर्ट टर्म’, ‘मिड टर्म’ आणि ‘लॉंग टर्म गोल्स’चा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राबविण्यात येणार आहे,” अशा स्पष्ट शब्दांत सरकारची भूमिका मांडली. यावर पुढे बोलतांना त्यांनी, “हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य माझ्यासाठी महत्वाचे आहे,” असे सांगितले.

आमदार सुधीर मुनगंटीवार मागील काही दिवसांपासून चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहेत. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, “मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला. या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळेच मी या निर्णया पर्यंत पोहचली आहे.”

कोल वाॅशरीला तात्काळ क्लोजर नोटीस

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणाबाबत न्याय्य अशी कठोर भूमिका घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महामाया कोल वॉशरीला तात्काळ ‘क्लोजर नोटीस’ जारी करण्याचे निर्देश दिले. प्रदूषणासंदर्भातील सुनावणीस संबंधित उद्योग हजर न राहिल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न

उद्योगांच्या प्रदूषणामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असून समितीने दिलेल्या आदेशांचे पालन उद्योगांनी करणे बंधनकारक असल्याचे मंत्री मुंडे म्हणाल्या. संबंधित उद्योगांनी बाधित शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ नोटीस देणे किंवा बँक गॅरंटी जप्त करणे पुरेसे नसल्याचे सांगत त्यांनी उद्योगांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची भूमिका मांडली. उद्योग बंद करणे हा उद्देश नसून रोजगार टिकवत प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक गुंतवणूक उद्योगांनीच करावी, असे आवाहन त्यांनी केले.
थर्मल पॉवर प्रकल्पांचे प्रदूषणविषयक ऑडिट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

कठोर उपाय केले जातील

फ्लाय ॲश व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, रस्त्यांवरील कोळशाची धूळ आणि श्वसनविकारांना कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर कठोर उपाययोजना केल्या जातील. फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशन (FGD) प्रणालीची अंमलबजावणी आवश्यक असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये करण्यावर भर दिला जाईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बँक गॅरंटीची रक्कम वाढविण्याबाबत समिती स्थापन करण्यात येत असून त्यात लोकप्रतिनिधी, आयआयटी पवईचे तज्ज्ञ आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान वापरणारे उद्योजक यांचा समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय कोल वॉशरी व खाणींच्या परिसरातील बाधित जमिनी, हरित पट्टे निर्माण करणे, वनीकरण वाढविणे तसेच आवश्यक ठिकाणी गावांच्या पुनर्वसनाबाबतही महसूल, उद्योग व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने धोरणात्मक निर्णय घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती ही मंत्री मुंडे यांनी सभागृहाला दिली. या लक्षवेधी दरम्यान विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे, किशोर जोरगेवार, नाना पटोले, राजेश पवार, देवराव भोंगळे, भास्कर जाधव, ज्योती गायकवाड या सदस्यांनीही सहभाग घेतला.

हेही वाचा

लक्षवेधी