अंबरनाथ, दि. ०७ [नितीन तोरस्कर] :- भारतीय जनता पक्षाकडून देश पातळीवर ‘कॉँग्रेस मुक्त भारत’ चा नारा देण्यात येत असतांनाच मुंबई उपनगराचा भाग असलेल्या अंबरनाथ नगरपरिषद मध्ये भाजप ने चक्क शिवसेनेशी फारकत घेवून कॉँग्रेसचे मंगळसूत्र गळ्यात घालत सत्ता स्थापन केली आहे. ‘कॉँग्रेस का हाथ, दहशतवाद के साथ’ म्हणणाऱ्या भाजपने कॉँग्रेस सोबत केलेल्या या आघाडीमुळे खळबळ उडाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २६ नगरसेवक विजयी झाले. भाजपचे १६, कॉँग्रेसचे १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ०४ नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले. केंद्रात आणि राज्यात असलेल्या महायुतीच्या सत्तेच्या दृष्टीने विचार करता शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येवून अंबरनाथ नगरपरिषदेत सहज सत्ता स्थापन करू शकले असते. पण नगरपरिषदेतील ‘अर्थपूर्ण’ विषयांवर एकमत होऊ न शकल्यामुळे भाजपने शिवसेनेशी फारकत घेवून थेट कॉँग्रेस सोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. कॉँग्रेसचे मंगळसूत्र गळ्यात घालत भाजपने अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली.
त्यामुळे सर्वाधीक नगरसेवक निवडून येवून ही शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. भाजपच्या या धक्कादायक निर्णयावर बोलतांना उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “ही अभद्र युती असून कॉँग्रेसला दहशतवाद धार्जिने संबोधणाऱ्या, कॉँग्रेसला देश विरोधी संबोधणाऱ्या, देशातून कॉँग्रेसचे उच्चाटन करून टाकू म्हणणाऱ्या पक्षाकडूनच कॉँग्रेसला अशा प्रकारे देण्यात येणारे बळ महाराष्ट्र कधी ही विसरणार नाही. देश कधी ही विसरणार नाही. या देशातील हिंदू कधी ही विसरणार नाही.” अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.
“भाजपची सत्तेची अघोरी भूख पाहवत नाही…” असे भाष्य महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते. त्याला अनुसरूनच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे [उबाठा] पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी, “अजित पवारांच्या बोलण्यात सत्य असून भाजप शिंदे सेनेला लवकरच गिळंकृत केल्याचे आपणास दिसेल…” असे वक्तव्य केले होते. त्याचाच प्रत्यय या राजकीय घटनेतून येत असल्याची चर्चा राज्य भरात सुरू आहे.
