छत्रपती संभाजीनगर, दि. १० [प्रतिनिधी] : भारतीय वंशाचा अवघा २७ वर्षीय सुदीप जन्जम हा तरुण ‘व्हेंचर कॅपिटल’ या न्यूयॉर्क स्थित कंपनीचा भागीदार झाला आहे. कंपनीच्या मुळ मालकाशी त्याने ‘पार्टनरशिप डिड’ केली असून आता तो या कंपनीचा मालक झाला आहे.
अमेरिकेत अशी मजल घेणाऱ्या सुदीप जन्जमचे छत्रपती संभाजीनगरशी जवळचे नाते आहे. त्याची आई सुनीता कोसलगे ह्या मुळच्या छत्रपती संभाजीनगर येथील असल्याने तो एका अर्थाने छत्रपती संभाजीनगरचा नातू आहे. येथील वेदांतनगर भागात राहणाऱ्या दत्तात्रय कोसलगे यांची बहीन सुनीता कोसलगे ह्यांचा विवाह अमेरिका स्थित दिवाकरराव जन्जम यांच्याशी नव्वदच्या दशकात झाला. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या सुनीता यांचा मुलगा सुदीपचा जन्म, शिक्षण सर्व अमिरिकेत झाले. शिक्षणात हुशार असलेल्या सुदीपला अमेरिकन औद्योगिक क्षेत्राची आवड होती.
अमेरिकन औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास करत तो न्यूयॉर्क मधील ‘व्हेन्चर कॅपिटल’ या वित्तीय कंपनीत नौकरीला लागला. आपल्या अभ्यासाच्या, कंपनी प्रती समर्पित भावनेच्या बळावर तो त्या कंपनीचा उपाध्यक्ष झाला आणि आता त्याच कंपनीचा भागीदार, मालक. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्याने गाठलेला यशाचा हा नेत्रदीपक टप्पा अमेरिका तसेच ईतर देशातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
