बारामती, दि. २८ [प्रतिनिधी] :- राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात त्यांच्यासह ईतर पाचजनही मृत्यूमुखी पडल्याचे कळते. दादांच्या अचानक निरोपाच्या या दु:खद वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून सामान्य नागरिकांसह सर्वच क्षेत्रातील व्यक्तींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार आज सकाळी ८.१० वाजता मुंबई मधून बारामतीला खाजगी विमानाने रवाना झाले होते. जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने बारामती परिसरात त्यांचा हा दौरा होता. मुंबई ते बारामती असा जवळपास ४०-४५ मिनिटांचा त्यांचा हा विमान प्रवास व्यवस्थित झाला. पण बारामती विमानतळाजवळ पोहचताच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे त्यांच्या विमान चालकाला लक्षात आले.
दरम्यान त्यांच्या विमान चालकाने सुरक्षीत ‘लॅंडिंग’ करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना अपयश आले. दादांचे विमान धावपट्टीवर उतरण्यापुर्वीच बारामती विमान तळाच्या शेजारील शेतात कोसळले. विमान कोसळताच विमानाने पेट घेतला. विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. घटनास्थळी धुराचे मोठे लोट पसरले. मोठा आवाज, आगीचा भडका आणि धुराचे मोठे लोट पाहून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे जिल्हा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, अग्निशमन दलाने तसेच विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात असलेले त्यांचे सुरक्षा रक्षक दिलीप जाधव, विमान चालक कॅप्टन सुमित कपूर, विमान सह-चालक कॅप्टन शांभवी पाठक विमान कर्मचारी पिंकी माळी यांचा ही मृत्यू झाला असल्याचे कळते.
अजित दादांच्या विमान अपघाताचे वृत्त कळताच संपूर्ण पवार कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दादांच्या अशा जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निवधनाच्या वृत्ताने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांसह अनेक पक्षाचे ज्येष्ठ नेते ढसाढसा रडतांना दिसून येत आहेत. दादांच्या निधनावर प्रतिक्रिया देतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “जनसामान्यांचा दादा हरपला, सामान्यजणांचा नेता गेला, दिलदार मित्र गेला….या वृत्तावर विश्वास बसत नाही…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

