नवी दिल्ली, दि. ०४ [वृत्तसंस्था] :- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून बहुचर्चित पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी मध्ये तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षा तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धूळ चारत भाजपने पश्चिम बंगाल मध्ये अभूतपूर्व यश मिळविले आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी मधील विजयाने २२ राज्यातील सत्तेसह भारत मोदीमय झाल्याचे पहावयास मिळत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण २९३ विधानसभा मतदार संघापैकी २१० विधानसभा मतदार संघातील विजयासह भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी मध्ये घवघवीत यश मिळविले आहे. मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेस पक्षाला या निवडणुकीत १०० चा आकडा ही गाठता आला नाही. निवडणूक आयोगाने थोड्या वेळा पुर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जीच्या तृणमूल कॉँग्रेस पक्षाला केवळ ७७ जागांवर विजय मिळविता आला. तर कॉँग्रेसला या निवडणुकीत भोपळा ही फोडता आला नाही. ममता बॅनर्जी यांना स्वत:ला ही या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. भवानीपूर विधानसभा मतदार संघात झालेल्या त्यांच्या दारुण पराभवाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ही ग्रहण लागले.
काही वर्षांपूर्वी डाव्यांचा गड असलेल्या पश्चिम बंगाल नंतर केरळ हे राज्य डाव्यांचा गड म्हणून शिल्लक राहिले होते. या विधानसभा निवडणुकीत डाव्यांचा हा गड ही ढासळला. एकूण १४० विधानसभा मतदार संघांपैकी १०० जागांवर विजय मिळवत कॉँग्रेस आघाडीने इथे राहुल गांधींची लाज राखली. डाव्या आघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत वर्तविण्यात आलेल्या अंदाजाप्रमाणे दक्षिणात्य अभिनेता विजय थलपती यांच्या तमिळगा वैत्री कळघम [टीव्हीके] या पक्षाने विधानसभेच्या २३४ जागांपैकी १०७ जागांवर आघाडी घेत सत्तेचे दावेदार असलेल्या द्रमुक या राजकीय पक्षाला ७४ तर अण्णा द्रमुक पक्षाला ५३ जागांवर रोखले आहे. अभिनेता विजय थलपती यांच्या झंजावाता समोर ना विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पक्ष टिकू शकला, ना स्वत: स्टॅलिन टिकू शकले. दक्षिण भारताच्या राजकारणात विजय थलपती यांच्या रूपाने उदयास आलेल्या या नवीन ‘सुपर स्टार’ च्या झंजावाताने स्टॅलिन यांच्यावर ही पराभवाची नामुष्की ओढावली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी प्रमाणेच पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने चांगली कामगीरी करत २२ जागांवर आघाडी घेत पुद्दुचेरी मध्ये दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. मोदी-शहा झंजावाता समोर टिकाव न लागू शकलेल्या कॉँग्रेसला इथे केवळ ०६ जागी विजय मिळविता आल्याची माहिती समोर आली आहे.
त्याच प्रमाणे आसाम राज्यात ही कॉँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. १२६ विधानसभा मतदार संघाच्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०२ आमदार विजयी झाले असून कॉँग्रेसला २१ जागांवर समाधान मानावे लागले. तर ईतर ०२ ठिकाणी अपक्षांनी झेंडा फडकविला.
एकूणच २०१४ ला देशात आलेली मोदी लाट आज ही कायम असल्याचेच प्रमाण या पाच राज्यातील निवडणूक निकालांनी दिले असल्याचे पहावयास मिळत आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांपैकी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत भारतीय जनता पक्षाने भारत मोदीमय झाला असल्याचे परत एकदा स्पष्ट केले. भारतातील कोणत्याही निवडणुकीत हिंदुत्व, राष्ट्रीयत्व हेच प्रमुख मुद्दे ठरत आहेत; हे न उमजलेल्या विरोधकांना नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी केवळ ०८ राज्यांपूरते सीमित ठेवले आहे. त्यातही प्रमुख विरोधी पक्ष असलेला कॉँग्रेस पक्ष हा अवघ्या चार राज्यात सत्तेत आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या या अभूतपूर्व यशाने आनंदी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून देश भरात मिठाई वाटप करत, फटाके फोडत, ढोल-ताशांचा गजर करत आनंदोत्सव साजरा करणे सुरू आहे. भाजपच्या या आनंदोत्सवामुळे देशभरात उत्सवाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.
