छत्रपती संभाजीनगर, दि. १६ [प्रतिनिधी] :- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी पक्षाच्याच युवा पदाधिकाऱ्याला गुंडांमार्फत धमकावल्याचा प्रकार समोर आला असून विरोधकांना ईडी, सीबीआय, सीआयडी ची भीती घालून धमकावणाऱ्या भाजपने आता पक्ष पदाधिकाऱ्यां विरुद्ध ही सत्तेचा गैर वापर करणे सुरू केले की काय अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे क्रांती चौक सोशल मीडिया प्रमुख प्रवीण मारकळ पाटील यांनी आज भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तक्रार अर्ज केला. या तक्रार अर्जात त्यांनी किशोर शितोळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी तक्रारीत म्हटल्या प्रमाणे भाजपचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा विषय पक्ष श्रेष्ठींकडे का पोहचवला?” म्हणत मारकळ पाटील यांना पोलिसांकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाणीच्या, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

मारकळ पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे मारकळ पाटील ह्यांना किशोर शितोळे यांच्या सांगण्यानुसार काही लोकांकडून रात्री-बेरात्री भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शिवीगाळ करत धमकावण्यात येत आहे. तसेच रात्री-बेरात्री त्यांच्या घरा समोर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे किशोर शितोळे यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच जीवाचे काही बरे वाईट झाल्यास शितोळे यांना जबाबदार धरण्यात यावे, असे ही या पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांकडे केलेली तक्रार ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी ज्या व्यक्तींनी त्यांना धमकाविले, त्या व्यक्तींची नावे, नंबर ही सार्वजनिक केले आहेत.
किशोर शितोळे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळ्या रंगाने मिटवून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या प्रकरणाला प्रवीण मारकळ पाटील ह्यांनी वाचा फोडली होती. शितोळे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान असह्य असल्याची भावना व्यक्त करत मारकळ पाटील ह्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. हा राग काढण्यासाठी शितोळे यांनी मारकळ पाटील यांचा असा छळ चालवला असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची तक्रार मारकळ पाटील ह्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली असल्याचे कळते.

