Monday, June 8, 2026
Homeप्रादेशिकलघु, मध्यम दैनिके तसेच साप्ताहिकांवरील जाचक अटींबाबत तोडगा काढू-उपसंचालक दैठणकर

लघु, मध्यम दैनिके तसेच साप्ताहिकांवरील जाचक अटींबाबत तोडगा काढू-उपसंचालक दैठणकर

छत्रपती संभाजीनगर, दि. ०७ [प्रतिनिधी] :- लघु, मध्यम दैनिके तसेच साप्ताहिकांवर शासनाकडून लादण्यात आलेल्या जाचक अटीं संदर्भात ‘छत्रपती संभाजीनगर ओनर्स एडिटर फेडरेशन’च्या पदाधिकाऱ्यांनी आज उपसंचालक प्रशांत दैठणकर यांची भेट घेतली. यावेळी लघु, मध्यम दैनिके तसेच साप्ताहिकांच्या संपादकांची बाजू ऐकून घेत दैठणकर यांनी, “शासनाची भूमिका ही केवळ नियम अंमलात आणण्यापुरती मर्यादित नसून, वृत्तपत्र क्षेत्रातील अडचणी समजून घेत त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी देखील शासन पार पाडते,” अशा शब्दांत उपस्थित संपादक, पत्रकारांना आश्वस्त केले.

‘छत्रपती संभाजीनगर ओनर्स एडिटर फेडरेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपसंचालकांकडील या बैठकीत लघु, मध्यम दैनिकांच्या मालक-संपादकांनी आपल्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या. द्विवार्षिक पडताळणीतील जाचक अटी, जीएसटी बिलांची सक्ती, अपुरा जाहिरात दर, दीर्घकाळा पासून प्रलंबित असलेली जाहिरात देयके यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रे संपादित करणे, प्रकाशित करणे अवघड होत चालले असल्याचे उपसंचालकांच्या लक्षात आणून देण्यात आले.

मालक-संपादकांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर अत्यंत सहानुभूतीने विचार करत दैठणकर यांनी या विषयात समन्वयात्मक भूमिका घेतली. “शासनाची भूमिका ही केवळ नियम अंमलात आणण्यापुरती मर्यादित नसून, प्रत्यक्ष त्या-त्या क्षेत्रातील अडचणी समजून घेत त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी देखील शासन पार पाडते,” अशा शब्दांत त्यांनी ‘छत्रपती संभाजीनगर ओनर्स एडिटर फेडरेशन’च्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.

या पुढे जावून त्यांनी, “लघु व मध्यम वृत्तपत्रे ही लोकशाहीचे पायाभूत घटक असून ग्रामीण व स्थानिक स्तरावर माहिती पोहोचविण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या क्षेत्राला सक्षम ठेवण्यासाठी शासन सकारात्मक दृष्टीकोनातून यावर विचार करेल,” असेही यावेळी नमूद केले.

महत्त्वाचे म्हणजे, फेडरेशनने मांडलेले सर्व मुद्दे त्यांनी गांभीर्याने नोंदवून घेत ते तातडीने वरिष्ठ स्तरावर सादर करून योग्य निर्णयासाठी सक्रिय पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच या प्रक्रियेत स्वतः लक्ष घालून विषयाला गती देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे केवळ वृत्तपत्र मालक व संपादकांनाच नव्हे, तर या वृत्तपत्रांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो पत्रकार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळण्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे.

उपसंचालक प्रशांत दैठणकर यांच्याकडे करण्यात आलेल्या या मागणीला ‘छत्रपती संभाजीनगर ओनर्स एडिटर फेडरेशन’च्या बाळासाहेब रांजणीकर (दैनिक लोकविजय), किशोर महाजन (दैनिक शासन सम्राट), अरुण सुरडकर (दैनिक सामपत्र), कानिप अन्नपूर्णे (दैनिक प्रसार), डॉ. शेख अफसर (दैनिक आरोग्य जागृती), सुरेश शिरसागर (दैनिक औरंगाबाद दर्शन), राजू कांबळे (सांजवार्ता), मिर्झा शफी बेग, जावेद खान, सुरेश गायकवाड, जाबा साहेब, वाहेद भाई, अब्दुल गणी, नदीम सौदागर, वाय. के. नारायणपुरकर, शेख अनिस, शेख एजाज यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास ८० लघु, मध्यम दैनिके तसेच साप्ताहिकांच्या संपादक व मालकांनी पाठिंबा दर्शविला आहे.

हेही वाचा

लक्षवेधी