Monday, June 8, 2026
Homeप्रादेशिक'जो गेला तो महाराष्ट्राचा तारणहार होता; गुन्हा दाखल झालाच पाहिजे !'

‘जो गेला तो महाराष्ट्राचा तारणहार होता; गुन्हा दाखल झालाच पाहिजे !’

रोहित पवार आक्रमक

बारामती, दि. २६ [प्रतिनिधी] :- ‘जो गेला तो या राज्याचा तारणहार होता. त्याच्या संशयास्पद मृत्यू बाबत जर गुन्हा दाखल होत नसेल तर सामान्य माणसांच्या बाबत काय घडत असेल?’ असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज येथील पोलिस स्टेशन मध्ये उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली.

दि. २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्या विमान अपघातात त्यांच्यासह अन्य चारजन मृत्यू मुखी पडले होते. अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने महाराष्ट्राला धक्का बसला. त्यांच्या विमान अपघाताच्या घटनेमागे घातपात असल्याच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यांच्या निधनाच्या दिवशीच काही राजकीय नेत्यांसह सामान्य जनतेने ही या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.

जनतेच्या नेत्याच्या संशयास्पद मृत्यूबाबत जनतेकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांना आमदार रोहित पवार यांनी वाचा फोडली. त्यांनी अजित पवारांच्या दशविधी नंतर पत्रकार परिषद घेवून अनेक प्रश्न उपस्थित करत अजित पवारांच्या विमान अपघाताची आंतरराष्ट्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली. तसेच त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना ही स्वत: लक्ष घालून याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली.

दिल्ली मध्ये काही गुप्तहेरांची, गुप्तहेर यंत्रणांची भेट घेत, पत्रकार परिषदा घेत अजित पवारांच्या विमान अपघाताचे सत्य जनतेसमोर आणण्याचे प्रयत्न रोहित पवार सातत्याने करत आहेत. दरम्यान या प्रकरणी व्हीएसआर विमान कंपनी मालका विरुद्ध तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी बुधवार, दि. २५ रोजी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशन मध्ये पोलिस तक्रार केली. परंतु त्यांची पोलिस तक्रार घेण्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे तिथे तनावाचे वातावरण निर्माण झाले.

आज परत त्याच विषयात त्यांनी बारामती पोलिस स्टेशन मध्ये पोलिस तक्रार दिली. यावेळी त्यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ताफा ही पोलिस स्टेशन बाहेर जमा झाला. बारामती पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत “जो मेला तो या राज्याचा तारणहार होता. त्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे,” असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी पोलिस स्टेशन बाहेर जमलेले शेकडो कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.

मरीन ड्राइव्ह पोलिसांप्रमाणेच बारामती पोलिस ही अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास नकार देत असल्याने वकिलांचा फौजफाटा घेवून रोहित पवार बारामती पोलिस स्टेशन मध्ये ठाण मांडून बसले आहेत. एकूणच अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिस तयार नसल्याचे हे चित्र महाराष्ट्राच्या पचणी न पडणारे आहे.

हेही वाचा

लक्षवेधी