Monday, June 8, 2026
Homeप्रादेशिक'सांगा देवेंद्रजी आमचे दहा कोटी गेले कुठे?'

‘सांगा देवेंद्रजी आमचे दहा कोटी गेले कुठे?’

आर्य वैश्य समाजाचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई, दि. ०९ :- आर्य वैश्य समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला घोषित दहा कोटींचा निधी अद्यापही न मिळाल्याने संतप्त झालेल्या आर्य वैश्य समाजाकडून “सांगा देवेंद्रजी आमचे दहा कोटी गेले कुठे….?” असा खोचक सवाल मुख्यमंत्री फडणवीस ह्यांना करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अनेक महामंडळांचे गठन केले होते. त्यातील केवळ तीन महामंडळे कार्यान्वित करण्याची प्रक्रिया फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने सुरू केली. तीन महामंडळांपैकी केवळ परशुराम आर्थिक विकास महामंडळ खऱ्या अर्थाने कार्यान्वित करण्याचे काम फडणवीस सरकारने केले.

ब्राह्मण समाजाच्या ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’ प्रमाणेच आर्य वैश्य समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळा’स ही निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा अध्यादेश राज्य शासनाने दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी काढला. तसेच या महामंडळा अंतर्गत ‘व्यक्तिगत व्याज परतावा योजना’ आणि ‘गट कर्ज व्याज परतावा योजना’ ह्या दोन योजना तात्काळ सुरू करण्यात आल्याचे फडणवीस सरकारने जाहीर ही केले.

पण प्रत्यक्षात मात्र हे महामंडळ कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले ना कार्यालय या महामंडळास देण्यात आले, ना या महामंडळाचे आवश्यक असलेले पोर्टल सुरू करण्यात आले, ना या महामंडळाच्या अध्यक्षाची निवड करण्यात आली, ना या महामंडळाचे अशासकीय संचालक मंडळ स्थापन करण्यात आले, ना या महामंडळा अंतर्गत घोषित केलेल्या योजनांसाठी लागणारा निधी या महामंडळास देण्यात आला.

तरी हे महामंडळ कार्यान्वित करण्यात आल्याचा, या महामंडळास दहा कोटीचा निधी देण्यात आल्याचा बनाव राज्य सरकार करत आहे. सरकारच्या या थापाड्या धोरणाने त्रस्त झालेल्या आर्य वैश्य समाजाकडून “देवेंद्रजी आमचा समाज हा भाजपचा परंपरागत मतदार असलेला समाज आहे. “आमचे महामंडळ कार्यान्वित केले, आमच्या महामंडळाला दहा कोटी दिले….असे खोटे बोलून किमान आमच्या समाजाची तरी चेष्टा करू नका. जर तुम्ही खरच दहा कोटी दिले, तर ते दहा कोटी आहेत कुठे ते तरी सांगा….” असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस ह्यांना करण्यात येत आहे.

“फडणवीस सरकारच्या काळात २०१६ साली अशा प्रकारच्या स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची मागणी सर्वप्रथम केली आम्ही. यासाठी प्राण पणाला लावून लढलो आम्ही. यासाठी थेट मंत्रालया समोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला आम्ही. तरी उपेक्षित राहिलो आम्ही, याचे दुःख वाटते.”
ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार
अध्यक्ष
आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र.

हेही वाचा

लक्षवेधी