Monday, June 8, 2026
Homeप्रादेशिक'समाजातील गरीब घटकांसाठी स्थापन झालेले हे महामंडळ गरीबांसाठीच राहावे'

‘समाजातील गरीब घटकांसाठी स्थापन झालेले हे महामंडळ गरीबांसाठीच राहावे’

आमदार राजेश दादा विटेकर यांच्या माध्यमाने आर्य वैश्य समाजाचे अजित दादांना निवेदन

परभणी, दि. २२ [प्रतिनिधी] :- आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी राज्यशासनाने ‘श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन केले. समाजातील गोर-गरीब बांधवांच्या कल्याणाच्या हेतूने स्थापन झालेले हे महामंडळ गोर-गरीब बांधवांसाठीच राहावे, अशी मागणी आर्य वैश्य समाज, सोनपेठ यांनी आज सोनपेठ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश दादा विटेकर यांच्या माध्यमाने उप-मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा यांच्याकडे केली.

आर्य वैश्य समाज, सोनपेठ यांनी आज सकाळी आमदार राजेश दादा विटेकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आर्य वैश्य समाजातील सर्वसामान्य समाज बांधवांची या महामंडळा बाबत काय भूमिका आहे, या महामंडळाच्या मुख्य कार्यालया बाबत राज्य भरातील आर्य वैश्य समाजबांधवांचे काय मत आहे, राज्य भरातील आर्य वैश्य समाज बांधवांच्या कल्याणाच्या दृष्टीने या महामंडळाच्या अशासकीय संचालक मंडळाचे स्वरूप कसे असावे, याबाबत राजेश दादा विटेकर यांच्याशी चर्चा केली.

हे महामंडळ जरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईतर महामंडळां सोबत स्थापन झाले असले तरी या महामंडळाच्या स्थापनेसाठी ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ ने २०१६ ते २०२४ या काळात कसा संघर्ष केला, याबाबतची सविस्तर माहिती आमदार विटेकर यांना दिली. तसेच २०१६ ते २०२४ या काळात संघर्ष समितीने यासाठी राज्य भरात घेतलेल्या बैठका, पत्रकार परिषदा, केलेले आंदोलने, लोकप्रतिनिधी तसेच मंत्र्यांच्या घेतलेल्या भेटी, त्यांना दिलेले निवेदने, प्रसिद्धी माध्यमातून सतत केलेली जनजागृती या सर्व बाबीचे कात्रणे असलेली संचिका ही विटेकर यांना दिली.

त्या सोबतच उप-मुख्यमंत्री अजित दादा पवार आणि आमदार राजेश दादा विटेकर यांच्या नावाने एक सविस्तर निवेदन ही ज्ञानेश्वर माऊली डमढेर, बालाजी वांकर, बालाजी पदमवार, जीवन बसेट यांच्या नेतृत्वात आर्य वैश्य समाज, सोनपेठ यांनी आमदार विटेकर यांना दिले. सदर निवेदनाद्वारे समाजातील गोर-गरीब बांधवांनी समाजातील गोर-गरीब बांधवांच्या कल्याणासाठी शासनाकडून आणलेले हे महामंडळ समाजातील गोर-गरीब बांधवांसाठीच राहावे, या हेतूने या महामंडळाचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई येथे करण्यात यावे, या महामंडळावर प्राण पणाला लावून लढणाऱ्या संघर्ष समितीच्या किमान चार पदाधिकाऱ्यांना अशासकीय सदस्य म्हणून घेण्यात यावे, या महामंडळाच्या अध्यक्ष पदी या महामंडळाची संकल्पना मांडणाऱ्या, ही संकल्पना प्रत्यक्षात साकारावी, समाजातील गोर-गरीब बांधवांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने या महामंडळाच्या रूपाने कायम स्वरूपी आर्थिक तरतूद करावी म्हणून मागील दहा वर्षांपासून प्राण पणाला लावून लढणाऱ्या ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांची नियुक्ती करावी, अशा प्रमुख तीन मागण्या अजित दादा यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

यावर आमदार राजेश दादा विटेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ या निवेदनाला त्यांचे पत्र जोडून उप-मुख्यमंत्री अजित दादा पवार यांना मेल केला. तसेच याबाबत अजित दादा यांच्याकडे बैठक लावण्याचा शब्द आर्य वैश्य समाजाच्या शिष्ट मंडळाला दिला.

हेही वाचा

लक्षवेधी