महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले. ज्यांनी मागील टर्म मध्ये आपले उखळ पांढरे करून घेतले, घरं भरले…ते परत गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचाराला लागले….विचार करा जी कामे त्यांनी केली नाहीत, ती कामे केली म्हणून सांगण्याचे, त्या कामांच्या नावाने मते मागण्याचे हे धाडस यांच्यात येते कुठून…?
मतदारांच्या काणाडोळा करण्याच्या वृत्तीतून आणि संबंधीत राजकीय पक्ष नेत्यांच्या मूकसंमतीतून….!
आता हा छत्रपती संभाजीनगर मधील प्रकार बघा. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग १९ साठी माजी नगरसेविका पुत्र प्रदीप बुरांडे यांचा हा प्रचारफंडा म्हणजे मतदारांच्या डोळ्यांवर राष्ट्रहिताच्या, धर्महिताच्या पट्ट्या आहेत, हे गृहीत धरून राजकारणी बेधडकपणे खोट्याचा बाजार मांडतात, याचे प्रमाण होय.
जी कामे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या आमदार निधीतून झाली, ती कामे आपल्या निधीतून झाल्याचे सांगत या महाशयांनी खोट्याचा बाजार भरविला आहे. मतदारांनी परत आपल्यालाच संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी एका पत्रकाद्वारे मतदारांना केले. या पत्रकात नगरसेविका पुत्र म्हणून आपल्या कार्य काळात आपण ०८ कोटी ५० लाखांचा निधी आणला, तो विविध विकास कामांवर खर्च केला, हे पटवून देण्यासाठी या महाशयांनी छत्रपती संभाजीनगर येथील देवानगरी ते प्रतापनगर या रस्त्याचे काम, पूलाचे काम, प्रतापनगर स्मशान भूमीचे काम, खुल्या भूखंडावर उद्यान विकसीत करण्याचे काम आपण केल्याचा दावा केला आहे.
वास्तविक पाहता छत्रपती संभाजीनगर मधील देवानगरी ते प्रतापनगर या रस्त्याचे काम छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निधीतून झाले आहे. एवढेच नव्हेतर देवानगरी, प्रतापनगर तसेच सातारा परिसरातील रहिवासी या रस्त्याने ये-जा करतांना त्यांची हाडे खिळखिळी होत होती. हा असह्य त्रास कमी व्हावा म्हणून नागरिकांनी स्वत: पालकमंत्र्यांकडे या रस्त्याच्या कामाची मागणी केली. त्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. तेंव्हाकुठे हा रस्ता झाला आणि आता निवडणुका लागताच हे महाशय सदर रस्ता आपल्या निधीतून झाल्याचा दावा करत आहेत. तसेच ज्या पूलाचा उल्लेख हे करत आहेत, तो पूल देखील त्याच रस्त्याच्या कामाचा भाग म्हणून पालकमंत्री शिरसाट यांच्या निधीतून झाला आहे. आता या भागात झालेल्या रेल्वे पूलाचे काम यांच्या निधीतून झाले असेल तर माहीत नाही, अशी कोपरखळी या भागातील मतदार यांनी लावलेल्या दिव्या बाबत मारत आहेत.
ज्या प्रतापनगर स्मशान भूमीच्या विकास कामाचा उल्लेख हे सदर पत्रकात करत आहेत, त्या कार्याचा ही यांच्या निधीशी काही ही संबंध नाही. मुळात ते कार्य आत्ता होत आहे आणि यांचे नगरसेवक पद २०१९ लाच गेले आहे. यांच्यात खोटे बोलून मते मिळविण्याचा विश्वास एवढा की, या भागात उकिरड्याच्या जागेचे रूपांतर उद्यानात करत मोकळ्या जागेवर ‘आर्य वैश्य शतपावली उद्यान’ साकारले ‘आर्य वैश्य बहूउद्देशिय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर’ या सामाजिक संस्थेने आणि हे महाशय ते उद्यान ही आपल्या निधीतून आपण साकारल्याचे सांगत आहेत. जी कामे यांनी यांच्या निधीतून केली नाहीत, ती कामे आपल्या निधीतून केल्याचे सांगत आपण नगरसेवक विकास निधी कसा हडपला याचा पुरावा हे स्वत: देत आहेत.
त्यामुळे याच परिसरात राहणाऱ्या एका सजग मतदाराने त्यांच्या फेसबुक वॉलवर जाऊन त्यांना याबाबत थेट प्रश्न केले आहेतच. पण एवढ्याने खोट्याचा बाजार उठणार नाही. म्हणून प्रत्येक मतदाराने बोलके झाले पाहिजे, प्रश्न केले पाहिजे.
विशेष म्हणजे, प्रभाग १९ चा भाग असलेल्या देवानगरी भागातील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी परिसरातील रहीवासी, प्रामुख्याने भगिनी रस्त्यावर उतरल्या, त्यावेळी हे महाशय त्यांच्या ‘हितात’ मग्न होते आणि आता निवडणुका लागताच यांच्या अंगात जनसेवा संचारली…
मतदारांनो, जर तुम्हाला खरंच आपल्या शहरांच उज्वल भविष्य पहायचे असेल, आपल्या भागातील समस्यांबाबत, प्राथमिक सोयी-सुविधांबाबत, आपल्या शहराच्या विकासाबाबत पुढील पाच वर्षे कन्हत-कन्हत जगायचे नसेल तर खोटारड्या, भ्रष्ट माजी नगरसेवकांना, राजकारण्यांना थेट भिडा. त्यांना थेट जाब विचारा. भ्रष्ट, नीतीभ्रष्ट राजकारण्यांना तर नाहीच नाही, अशांना मोठे करणाऱ्या राजकीय पक्षाला ही मते देऊ नका. ही काही लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही, राष्ट्रहिताला, धर्महिताला महत्व देत भ्रष्टाचाऱ्यांना मतदान करायला…!
राज्यातील प्रत्येक महापालिका निवडणुकीत आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात खोट्याचा बाजार असाच भरत आहे. मतदारांनो जागे व्हा, याकडे कानाडोळा करू नका. हा बाजार आत्ताच उठवला नाहीतर परत पुढील काही वर्षे पाण्यासाठी, रस्त्यांसाठी, स्वच्छतेसाठी कन्हत-कन्हत जगावे लागेल….म्हणून सावध व्हा, एकजूट व्हा, खोट्याचा बाजार उठवा…!!

