Tuesday, July 28, 2026
Homeलेखमाय बाप सरकार माफ करा; डोळ्यात अंजन नाही, मुसळ घालतोय....!

माय बाप सरकार माफ करा; डोळ्यात अंजन नाही, मुसळ घालतोय….!

माय बाप सरकार माफ करा; डोळ्यात अंजन नाही, मुसळ घालतोय….कारण आमच्याच मतांच्या दानावर सत्ता भोगत असलेल्या तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आमच्या जीवावर उठले आहेत…आम्ही सत्य बोलतो, सत्य लिहितो हा आमचा गुन्हा….? म्हणून तुमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तुमच्या पक्षाचे नगरसेविका पुत्र थेट आम्हाला संपविण्याची भाषा करतात….!

जर आमच्या सारख्या भाजप विचारांच्या पत्रकारांसोबत असे घडत असेल, तर लोकशाही पूजक ईतर राजकीय विचारांच्या पत्रकारांशी, सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर सामाजिक प्रसार माध्यमातून बोलणाऱ्या सर्वसामान्यांशी काय-काय घडत असेल….? या विचारानेच डोके सुन्न पडत आहे…

आम्ही सरकार श्रद्धेय अटलजींचे ही पाहिले, अनुभवले. आम्ही सरकार स्वर्गीय मुंडे साहेबांचे ही पाहिले, अनुभवले. अशी आपल्याच माणसांच्या जीवावर उठणारी क्रूरता दूरच, निर्दयी किंवा साधे द्वेष भावही त्यांच्यात नव्हते….त्यांच्या काळात ईतर विचारांच्या पत्रकारांनी नाही-नाही ते प्रकरणं उकरून काढलीत. पण एखादे पत्रकार शिवानी भटनागर हत्या प्रकरण वगळता अन्य कोणत्या प्रकरणात त्या हिंदुत्ववादी सरकारचे हात दिसून आले नाहीत. इथे तुमच्या सरकारात मात्र ऊठसूठ कोणीही उपटसुंभ जीवे मारण्याच्या धमक्या देतोय.

आम्ही ‘आर्य वैश्य बहूऊद्देशिय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीगर’ च्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने देवानगरी, छत्रपती संभाजीनगर परिसरात रेल्वे सुरक्षा भिंतीला लागून उकिरड्याच्या जागेचे रूपांतर उद्यानात केले. उकिरड्याच्या जागेवर देशी वृक्षांचे रोपण, संवर्धन करून ‘आर्य वैश्य शतपावली उद्यान’ साकारले. आज हे उद्यान खारुताई, पक्षी, फुलपाखरे, मधमाशा, सरपटणारे जीवजंतु यांच्यासाठी हक्काचा अधिवास म्हणून बहरत आहे. माणसांसाठी ‘ऑक्सीजन हब’ ठरत आहे. कोणाकडून ही एक रुपया देणगी अथवा वर्गणी न घेता मागील दहा वर्षांपासून आम्ही ह्या उद्यानाची काळजी वाहत आहोत. हे उद्यान संवर्धत आहोत.

आम्ही आमच्या पैशाने निर्मिलेल्या संवर्धलेल्या या उद्यानाचे बील उचलून खाण्याचे पाप तुमच्या पक्षाच्या नगरसेविका पुत्र प्रदीप बूरांडेने केले. त्याने हे पाप केले, याचे काही नाही आणि आम्ही त्यावर बोलतो, लिहितो तर ते गुन्हा ठरते, गुन्हा ठरविल्याजाते…आमच्या विरुद्ध खोट्या पोलीस तक्रारी दिल्या जातात….यासाठीच आम्ही दिवसरात्र भाजपचा जप करत तुम्हाला निवडून दिले का…? आम्ही हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला आपले मानायचे, तुम्हाला डोक्यावर घेवून नाचायचे आणि सत्ता आली की तुम्ही भ्रष्टाचार करत घर भरायचे….आम्ही बोललो की थेट आमच्या जिवावर उठायचे…?

तुमचे नगरसेविका पुत्र शेर, तर तुमचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे सव्वाशेर….ते तर स्वत:ला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा ही मोठे समजायला लागले…!

राज्यातील ईतर शहरांप्रमानेच छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागात ‘देवाभाऊ कॅम्पेन’ मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळ्या रंगाने मिटविण्याच्या घटना घडल्या. या घटनेबाबत तुमच्याच पक्षाच्या प्रवीण मारकळ पाटील नामक युवा पदाधिकाऱ्याने तुमच्या शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना “दादा आपल्या देवाभाऊ कॅम्पेन मधील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काल पर्यंत व्यवस्थित होते. पण आता त्याला कोणीतरी काळे फासलेले दिसते” असा व्हाटस-अप संदेश पाठविला. त्यावर किशोर शितोळे यांनी “आपणच केले” असे धक्कादायक उत्तर दिले.

शितोळे यांच्या या धक्कादायक उत्तराने अवाक झालेल्या प्रवीण मारकळ पाटील यांनी ही बाब भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या आणि ईतर काही भाजप श्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिली. शितोळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्यांनी शितोळे आणि त्यांच्यातील या व्हाटस-अप संवादाचे ‘स्क्रीन शॉट’ काही पत्रकारांना देत शितोळे यांच्या या घाणेरड्या राजकारणाला प्रसार माध्यमातून वाचा फोडण्याची विनंती केली. त्यानुसार आम्ही त्यावर लिखाण केले. तसेच “हे प्रकरण उघडकीस का आणले….मला शिवाजी महाराजांची माफी मागायला सांगणारा तू कोण…?” म्हणत शितोळे यांनी प्रवीण मारकळ पाटील यांना गुंडांकडून धमक्या देणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांकडून त्यांना मानसिक त्रास देणे असे प्रकार सुरू केले. त्यावरही आम्ही बातम्या केल्या, लिखाण केले. तर आमच्यावर ही खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला पोलिसांकडून मानसिक त्रास देण्याचे उपद्रव तुमच्या शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सुरू केले. आम्हाला संपवून टाकण्याच्या धमक्या सुरू केल्या. धक्कादायक म्हणजे किशोर शितोळे, “स्वत: मुख्यमंत्र्यांनी गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचे आदेश दिले….” असे सांगत सुटले आहेत.

भ्रष्टाचार करायचा, गुन्हे करायचे तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यावर का बोलता, का लिहिता म्हणून गुंडाकडून धमक्या देत, पोलिसांकडून गुन्हे दाखल करत जिवावर उठायचे आमच्या….? पैशांची भूक लागलेली कोठारे भरण्यासाठी, सत्तेची अघोरी भूक क्षमविण्यासाठी आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या, आपल्याच पक्षाच्या विचारसरणीच्या पत्रकारांच्या जिवावर उठणारे हे कोणते हिंदुत्ववादी सरकार बापा….?

जर हे असेच चालत राहिले तर हिंदुत्ववादी मतदारांना तुम्ही दिलेले हिंदुत्वाचे विचार हिंदुत्वाचे झापडं वाटायला लागतील. ते पाहता-पाहता गळून पडतील आणि परतीची लाट येईल….भरतीच्या लाटेपेक्षा परतीच्या लाटा घातक असतात; हे सुज्ञाशी सांगणे नव्हे…!

तसे ही अशोक खरात प्रकरणाने तुमच्या या मानीव हिंदुत्ववादी सरकारची महाराष्ट्राला शिसारी येत आहे…!!

हेही वाचा

लक्षवेधी