Monday, June 8, 2026
Homeराजकीयतिढा सुटला : महापौर भाजपचा, उप-महापौर शिवसेनेचा !

तिढा सुटला : महापौर भाजपचा, उप-महापौर शिवसेनेचा !

मुंबई, दि. २० [नितीन तोरस्कर] :- बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर पदावरून शिवसेना-भाजप मध्ये सुरू असलेली रस्सीखेच संपली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या निर्देशानुसार या रस्सीखेच मध्ये सन्मानजनक तोडगा काढत भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उप-महापौर असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

नववर्षांत बहुप्रतीक्षित महानगरपालिका निवडणुका लागून दि. १५ जानेवारी, गुरुवार रोजी राज्यभरातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान झाले. दि. १६ जानेवारी रोजी सर्व महानगरपालिका निवडणुकांचा निकाल आला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकांत ही भाजपने बाजी मारत तब्बल २९ पैकी २४ महानगरपालिकांवर महायुतीचा भगवा फडकविला. तर ९ महानगरपालिकांमध्ये निर्विवाद बहुमत मिळविले.

या महानगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या युतीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ही शिवसेना-भाजप युतीने यश संपादन करत वर्षानुवर्षांपासून बृहन्मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवणाऱ्या ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लावला. पण निवडणूक निकाल हाती येताच शिवसेना-भाजप मध्ये महापौर पदावरून रस्सीखेच सुरू झाली. या रस्सीखेचीच्या माध्यमातून सुरू केलेली राजकीय क्रयशक्ती कमी होऊ नये, आपल्याच पक्षावर ‘ऑपरेशन लोट्स’चा प्रयोग होऊ नये, म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख तथा उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील ‘हॉटेल ताज’ मध्ये ठेवले आहे.

शिंदेंनी सुरू केलेल्या या ‘हॉटेल पॉलिटिक्स’ मुळे राज्यात २०१९ ची राजकीय परिस्थिती निर्माण झाली. स्वत: एकनाथ शिंदे यांनी, “आम्ही त्यावेळच्या शिवसेने सारखी भूमिका घेवून राज्यात २०१९ ची स्थिती निर्माण करणार नाही. मुंबई महानगरपालिकेत युतीचाच महापौर होणार. पण शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी इच्छा मुंबईकरांची आहे. शिवसैनिकांची आहे.” असे भाष्य केल्याने मुंबईच्या महापौर पदावरून शिवसेना-भाजप मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चाना उधाण आले.

त्यातच ‘उबाठा’ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, “देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आपलाच होईल….” असे वक्तव्य केले. त्यामुळे मुंबई महानगरपालिके पासून एकनाथ शिंदे यांना दूर ठेवण्यासाठी ‘उबाठा’ भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याच्या विषयाची भर पडली. भाजप प्रवकत्यांनी ही, “राजकारणात अश्यक्य असे काहीही नसते…” अशा प्रतिक्रिया दिल्याने एकनाथ शिंदे यांनी महापौर पदाचा अट्टाहास न सोडल्यास भाजप उद्धव ठाकरे यांच्या मदतीने मुंबईत आपला महापौर करणार असल्याचे चित्र रंगले.

दरम्यान या सर्व राजकीय घडामोडींवर आणि या घडामोडींनी मतदारांवर होत असलेल्या विपरीत परिणामांवर लक्ष ठेवून असलेल्या भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज थेट निर्देश देत बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर पदावरून सुरू असलेले राजकीय डावपेच थांबविण्याचे सूचित केल्याचे कळते. याबाबत एका वरिष्ठ भाजप नेत्याकडून नाव न सांगण्याच्या अटीवर मिळालेल्या माहिती नुसार शिवसेनेशी सन्मानजनक वाटाघाटी करून मुंबईच्या महापौर पदाबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश अमित शहा यांनी फडणवीसांना दिले असल्याचे कळते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर पद भाजपकडे आणि उप-महापौर पद शिवसेनेकडे राहणार असल्याचे कळते. तसेच स्थायी समिती अध्यक्ष पद भाजप आणि शिवसेनेकडे अडीच-अडीच वर्षे राहणार असून महत्वाच्या समित्यांच्या पदाबाबत ही शिवसेनेचा मान राखण्यात येणार असल्याचे बोलल्याजात आहे.

 

हेही वाचा

लक्षवेधी