Monday, June 8, 2026
Homeप्रादेशिकगुलाल कोमट्यांचा : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्य वैश्य समाजाचे वीस नगरसेवक !

गुलाल कोमट्यांचा : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्य वैश्य समाजाचे वीस नगरसेवक !

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ [प्रतिनिधी] :- राज्यातील २४६ नगरपरिषद निवडणुकांचा निकाल दि. २१ रविवार रोजी लागला. या निवडणुकीत पक्षीय दृष्ट्या विचार करता विरोधी पक्षांचा उडालेला धुव्वा जसा चर्चेचा विषय ठरत आहे, तसाच या निवडणुकीच्या माध्यमातून २० नगरसेवकांसह आर्य वैश्य [कोमटी] जातीचा राजकारणात झालेला उदय ही चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र, मुंबई प्रांतात वास्तव्यास असलेल्या आर्य वैश्य [कोमटी] समाजाची जनसंख्या अवघ्या चार-साडेचार लाखांच्या घरात आहे. या अर्थाने हा समाज म्हणजे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाज. भाजपचा परंपरागत मतदार म्हणून ओळख असलेला हा समाज मात्र कायम स्वरूपी भाजप कडून ही उपेक्षीत राहत आला आहे. व्यापारी पिंडाचा, कामाशी काम ठेवून वागणारा असा हा समाज असल्यामुळे हा समाजही राजकारण आणि राजकीय व्यक्तींमध्ये फारशी रुचि ठेवतांना दिसत नाही.

याचे काही दुष्परिणाम ही या समाजाला भोगावे लागतात. निवडणुकांत आर्थिक रसद, राजकीय कार्यक्रमांना वर्गण्या, देणग्या देणारा समाज म्हणून पाहिल्या जाणाऱ्या याच समाजाला निवडणुकीच्या दृष्टीने नगण्य मतदार म्हणून, राजकीय दृष्ट्या महत्व नसलेले म्हणून पाहिल्या जाते. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकी पासून हे चित्र हळूहळू बदलत चालले आहे. आपल्या राजकीय अस्तित्वाची जाणीव करून दिल्याशिवाय आपल्याला राजकीय आणि सामाजिक न्याय मिळणार नाही, हे या समाजाच्या लक्षात यायला लागले.

मागील विधानसभा निवडणुकीत तर या समाजाच्या ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ या सामाजिक संघटनेने राज्यातील १६ विधानसभा मतदार संघात महायुती च्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत त्यांचा प्रचार ही केला होता. असे करतांना संबंधीत संघटनेने ज्या-ज्या विधानसभा मतदारसंघात आपल्या समाजाचे मतदान निर्णायक आहेत, असे मतदारसंघ निवडून त्या मतदार संघातील आर्य वैश्य समाजाला “बांधवांनो लक्षात घ्या, आपले मतदान कमी असल्यामुळे आपण राजकीय दृष्ट्या नगण्य असलो तरी, राजकीय दृष्ट्या महत्वाचे नसलो तरी आपण निर्णायक आहोत, हे लक्षात घ्या….आपण मते वळविण्याची ताकद असलेले आहोत, हे लक्षात घ्या…” म्हणत समाजजागृती केली होती.

अत्यंत अल्पसंख्यांक असल्यामुळे राजकीय दृष्ट्या महत्व नसलेला समाज म्हणून पाहण्यात येणाऱ्या या समाजात मागील दशकात या प्रकारची राजकीय-सामाजिक उत्क्रांती घडून येत आहे. दि. २१, रविवार रोजी आलेले नगरपरिषद निवडणुकीचे निकाल याचेच द्योतक. या निवडणुकीत विदर्भातून ०९ आणि मराठवड्यातून १० असे १९ नगरसेवक या समाजाचे निवडून आले आहेत.

त्यामध्ये सौ. विजयाताई धोंडूराम देबडवार [नगराध्यक्षा, शिवसेना, मुखेड], सुरेंद्र सूर्यकांत कोडगीरवार [नगरसेवक, भाजप, उमरखेड], सचिन बनगीनवार [नगरसेवक, दिग्रस], अश्विनी विक्रांत जिल्हेवार [नगरसेविका, पुसद], जयश्री धनंजय डुब्बेवार [नगरसेविका, पुसद], प्रियंका स्वप्नील बोकीलवार [नगरसेविका, पांढरकवडा], सपना संजय उपगन्लावार [नगरसेविका, यवतमाळ], संजय बंडोपंत व्यवहारे [नगरसेवक, आर्णी], मयूरभाऊ नळदकर [नगरसेवक, कंधार], संगीता आनंद भावठाणकर, [नगरसेविका, धारूर], गोविंदभाऊ अय्या, [नगरसेवक, गंगाखेड], -याकावार ताई [नगरसेविका, कुंडलवाडी], रत्नमाला ताई कौलवार [नगरसेविका, देगलूर], उज्वला ताई पदमवार [नगरसेविका, देगलूर], शिल्पा ताई पोकलवार [नगरसेविका, भोकर], शैलेशजी कत्रुवार [नगरसेवक, मानवत], बाळकृष्ण माडुरवार [नगरसेवक, देसाईगंज, चंद्रपूर], अमोल पांडुरंग चिल्लरवार [नगरसेवक, राजुरा], साईप्रसाद जटालवार [नगरसेवक, भोकर] यांच्यासह ईतर नगरसेवकांचा समावेश आहे.

हेही वाचा

लक्षवेधी