Monday, June 8, 2026
Homeलेखभाजपची नीती : कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अस्तित्वच नाही; उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना...

भाजपची नीती : कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अस्तित्वच नाही; उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना पक्षात घ्यायचे; शिवसेनेच्या जबाबदार कार्यकर्त्यांना खिशात घालायचे, युती करण्याची गरज काय ?

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आली तरी भाजप-सेना युतीचे गाडे पुढे सरकायला तयार नाही. युती करून निवडणूक लढण्याच्या दृष्टीने युतीच्या नेत्यांच्या होत असलेल्या बैठकांमध्ये जुनी भांडणे, जुने वाद उकरून काढण्यावरच भाजपचे स्थानिक पदाधिकारी भर देत असल्याचा आरोप पालकमंत्री तथा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.

तर दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून “शिवसेनेचे नेते वास्तविकता स्वीकारून युतीचा निर्णय घेण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडून अवाजवी मागण्या होत आहेत. त्यामुळे युती बाबत अद्याप एकमत होऊ शकले नाही,” असे सांगण्यात येत आहे. एकूणच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाणे भाजप-शिवसेना युतीबाबत सुरू असलेली टोलवाटोलवी, विधानसभेत, राज्यसभेत भाजपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या व्यूहरचना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार नसल्याचे संकेत देणाऱ्या आहेत.

राज्यभरातील नगरपरिषदेंच्या नुकत्याच लागलेल्या निवडणुक निकालांनी भाजप नेत्यांचा वाढलेला आत्मविश्वास, शिवसेनेत उभी फुट पाडतांना ठरलेली नीती, याचाच भाग म्हणून जिथे गरज तिथे युती, ईतर ठिकाणी सरळ लढत…हे भाजपचे राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकीतील सूत्र….!

त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या दृष्टीने विचार करता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आखाड्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आव्हान नसल्यात जमा आहे. राहिला विषय उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने [उबाठा] चा तर त्यांच्या विरुद्ध भाजपने ‘ऑपरेशन लोट्स’ चालवले आहे. जनाधार असलेले ‘उबाठा’चे दुसऱ्या फळीतील प्रमुख पदाधिकारी भाजपच्या गळाला लागले आहेत. तर काही शिवसेनेच्या. ‘उबाठा’ चे राजू वैद्य, गिरिजाराम हळनोर, मनोज गांगवे, आशा भालेराव हे प्रमुख चेहरे ‘उबाठा’तून बाहेर पडले आणि जे ‘उबाठा’त आहेत, ते रुसून बसले आहेत. शिंदेंच्या बंडाने उद्धव ठाकरेंकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे वगळता पहिल्या फळीतील अन्य नेते राहिले नव्हते आणि आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावेंच्या ‘ऑपरेशन लोट्स’ ने दुसऱ्या फळीतील नेते राहिले नाहीत.

‘उबाठा’ चे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, दिग्विजय शेरखाने, हरिभाऊ हिवाळे आणि ज्ञानेश्वर डांगे यांनी आपली एक वेगळीच मोट बांधून ‘उबाठा’ तील अंबादास दानवे-चंद्रकांत खैरेंच्या वर्चस्वाला शह देण्याची रणनीती आखली आहे. उमेदवारी वाटपात अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्याकडून करण्यात येणारा हुकमीपणा अमान्य असल्याचे सांगत या चारही शहरप्रमुखांनी ‘पक्ष नेतृत्वाने ऐकले तर ठीक, नाहीतर आम्हाला ही वाटा आहेत….’ असा निरोप उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना दिला असल्याचे समजते.

निवडणूक नियोजनाच्या दृष्टीने दानवे-खैरे यांनी आयोजित केलेल्या बैठकांकडे ‘उबाठा’ च्या या चारही शहरप्रमुखांनी फिरविलेली पाठ, माजी महापौर रशीद मामू यांचा ‘उबाठा’ प्रवेश, ‘उबाठा’ तील दानवे-खैरे वाद आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे मैदान मारता येण्यासाठी ईतर महानगरपालिकेच्या मैदानातून उद्धव ठाकरेंनी अघोषितपणे घेतलेली माघार संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ‘उबठा’ चे पानिपत होणार, याचे प्रमाण देणारे आहे….!

निवडणुकीचे वारे सुरू होताच पक्षांतराचे वारे सुरू होण्याचा प्रकार विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करत आहे. राज्यात याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरेंना बसत आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने युतीला जनादेश दिला होता. पण उद्धव ठाकरेंनी त्या जनादेशाचा मानभंग करत कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसशी संसार थाटत भोगलेले औट घटकेचे मुख्यमंत्री पद त्यांच्यासाठी अभिशाप ठरत आहे. त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या बळावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाच्या पहिल्या विशेष अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्ष नेते तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बना लेना, मै समंदर हूं लौटके जरूर आऊंगा….” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंना सूचक ईशारा दिला होता.

त्यावेळी उद्धव ठाकरेंना तो ईशारा तेवढा गांभीर्याने घेण्याची गरज वाटली नव्हती. पण नंतर घडत गेलेल्या राजकीय घडामोडींनी, सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालांनी, राज्यभरातील नगरपरिषद निवडणुकांच्या नुकत्याच आलेल्या निकालांनी उद्धव ठाकरेंची धूळधाण उडविली आहे. उद्धव ठाकरेंची उडालेली ही धूळधाण, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या राजकारणात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नावापुरते असलेले अस्तित्व भाजपला अघोरी राजकीय महत्वाकांक्षेकडे घेवून जात आहे.

याच अघोरी राजकीय महत्वाकांक्षेतून ‘उबाठा’ तील उरले-सुरले पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षात घेण्याची; शिवसेनेशी सरळ लढत करत निवडणुकी दरम्यान, मतदानाच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणुकीची जबाबदारी असलेले पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते ‘खिशात’ घालण्याची, निवडणुकीत बहुमत मिळाले नाहीतरी किमान ४०-४५ आपले नगरसेवक निवडून आणण्याची आणि निवडणुकीनंतर शिवसेनेशी युती करून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याची, रणनीती भाजपने आखली असल्याचे स्पष्ट होत आहे…!

हेही वाचा

लक्षवेधी